राज्य सरकारने कागदपत्रांचे सुरक्षित इलेक्ट्रॉनिक स्टॅम्पिंग आणि 9,999 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मुद्रांक शुल्कासाठी ई-स्टॅम्पिंग या डिजिटल प्रक्रियेचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पर्वरी येथे मंत्रालयात काल करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांची उपस्थिती होती. या ई-स्टॅम्पिंगच्या कार्यवाहीला येत्या 1 एप्रिलपासून सुरुवात केली जाणार आहे.
डिजिटल मुद्रांक शुल्क भरण्याची सेवा 7 दिवस आणि 24 तास उपलब्ध असणार आहे. अखंड आणि कागदविरहित व्यवहार, त्वरित पडताळणी आणि डिजिटल रेकॉर्ड, फसव्या पद्धतींचे उच्चाटन आणि महसूल नुकसान रोखण्यासाठी अचूक मुद्रांक शुल्क भरले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी भारतीय स्टॉकहोल्डिंग कॉर्पोरेशनची केंद्रीय रेकॉर्ड एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नवीन सुविधेसाठी राज्यातील सर्व मुद्रांक कागद विकणाऱ्या विक्रेत्यांना विश्वासात घेतले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एआय संचालित प्रणालींद्वारे आपत्ती व्यवस्थापन क्षमता वाढविण्यासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) सोबत एक सामंजस्य करार केला आहे.