बचाव फळीतील ब्रिटनचा ३४ वर्षीय खेळाडू डॅनिएल फॉक्स याने नोंदविलेल्या दुसर्या सत्रातील गोलाच्या जोरावर एससी ईस्ट बंगालने एफसी गोवा संघाला १-१ असे बरोबरीत रोखत सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शुक्रवारी अत्यंत नाट्यमय लढतीत गुण विभागून घेतले.
ईस्ट बंगाल पहिल्याच मिनिटाला पेनल्टी दवडणे, मग पिछाडीवर पडणे, बरोबरी साधल्यानंतर गोव्याचा एक खेळाडू कमी होणे, दोन्ही संघांच्या खेळाडूंत चकमक झडणे अशा घडामोडींमुळे हा सामना नाट्यमयी झाला.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर ही लढत झाली. आघाडी फळीतील स्पेनचा ३७ वर्षीय खेळाडू ईगोर अँग्युलो याने पूर्वार्धात गोव्याचे खाते उघडले. त्यानंतर ईस्ट बंगालला दुसर्या सत्रात बचाव फळीतील ब्रिटनचा ३४ वर्षीय खेळाडू डॅनिएल फॉक्स याने बरोबरी साधून दिली. पुढच्याच मिनिटाला गोव्याच्या एदू बेदियाला मैदान सोडावे लागले, पण २५ मिनिटांसाठी गोव्याने बचाव भक्कम ठेवला.
या बरोबरीमुळे गोव्याचे तिसरे स्थान कायम राहिले. १४ सामन्यांत त्यांची ही सहावी बरोबरी असून पाच विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १९ गुण झाले. चौथ्या क्रमांकावरील हैदराबाद एफसीपेक्षा ते दोन गुणांनी पुढे आहेत. हैदराबादने १४ सामन्यांत चार विजय, सात बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह १९ गुण मिळविले आहेत.
मुंबई सिटी १३ सामन्यांतून नऊ विजयांसह सर्वाधिक ३० गुण मिळवून आघाडीवर आहे. एटीके मोहन बागानचा दुसरा क्रमांक असून १३ सामन्यांतून २४ गुण अशी त्यांची कामगिरी आहे.
खाते उघडण्याची शर्यत गोव्याने जिंकली. पूर्वार्धाच्या अखेरीस मध्य फळीतील अल्बर्टो नोग्यूरा याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवून आगेकूच केली. त्याने दिलेल्या पासवर अँग्युलोने अफलातून फिनिशींग केले. गोव्याने मध्यंतरास ही आघाडी राखली.
ईस्ट बंगालने तासाभराच्या खेळानंतर बरोबरी साधली. ६५व्या मिनिटाला नायजेरियाचा प्रतिभाशाली खेळाडू ब्राईट एनोबाखरे याने डावीकडे फ्री किक मिळविली. मध्य फळीतील अँथनी पिल्कींग्टन याने फ्री किकवर मारलेला चेंडू बॉक्समध्ये येताच फॉक्सने फिनिशींग केले. त्यावेळी गोव्याचा गोलरक्षक धीरज सिंग बचाव करू शकला नाही.
त्यानंतर पुढच्याच मिनिटाला गोव्याचा एक खेळाडू कमी झाला. मध्य फळीतील एदू बेदिया याला दुसर्या यलो कार्डमुळे मैदान सोडावे लागले. त्याने चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी झालेल्या चुरशीत पिल्कींग्टनला पाडले. चारच मिनिटांपूर्वी त्याने पिल्कींग्टनला पाडले होते. या दोघांमध्ये त्याआधी ५०व्या मिनिटाला झटापट झाली होती. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघातील इतर काही खेळाडूही एकमेकांना भिडले होते.
सामन्याचा प्रारंभ नाट्यमय झाला. पहिल्याच मिनिटाला गोव्याचा बचावपटू महंमद अली याने चेंडूवरील ताबा गमावताच ईस्ट बंगालचा बचावपटू नारायण दास याला पाडले. त्यामुळे रेफरी हरीश कुंडू यांनी ईस्ट बंगालला पेनल्टी बहाल केली. मध्यरक्षक अँथनी पिल्कींग्टन याने ती घेतली. त्याने गोव्याचा गोलरक्षक धीरज सिंग याचा अंदाज चुकविला, पण चेंडू स्वैर मारल्यामुळे ही सुवर्णसंधी वाया गेली.
नॉर्थईस्टविरुद्ध मुंबई सिटीचे विक्रमाचे लक्ष्य
इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात आज शनिवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर मुंबई सिटी एफसीची नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होत आहे. त्यावेळी साखळीतील सर्वांत दीर्घ अपराजित मालिका नोंदविण्याचा विक्रम करण्याचे मुंबई सिटीचे लक्ष्य असेल. मुंबई सिटी गेल्या १२ सामन्यांत अपराजित आहे.
नऊ विजय आणि तीन बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे. सर्वाधिक ३० गुणांसह हा संघ आघाडीवर आहे. नॉर्थईस्टविरुद्ध जिंकल्यास किंवा बरोबरी साधल्यास ते एफसी गोवा संघाने २०१५ मध्ये नोंदविलेला उच्चांक मागे टाकतील. त्यामुळे स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या संघासाठी ही लढत महत्त्वाची आहे.