ईश्‍वरीय देणगी संस्कृत भाषा

0
411

– सौ. विणा विशांत वझे
‘‘संस्कृत नाम दैवी वाक् अन्वाख्याता महर्षिभि:|’’
‘संस्कृत भाषा’ साक्षात ईश्‍वराची मातृभाषा असल्याने ऋषी महर्षीकडून तिला ‘दैवी वाक्’ म्हणजेच देववाणी म्हटले आहे. आपले प्राचीन वैदिक वाङ्‌मयही संस्कृत भाषेतच आहे. कारण संस्कृत भाषेतील शब्दार्थामध्ये ईश्‍वरालाही जागृत करण्याचे, आकृष्ट करण्याचे सामर्थ्य आहे. संस्कृत या शब्दाचा व्याकरणदृष्ट्या विग्रह सम्+कृ या अनुक्रमे उपसर्गाने आणि धातूने दाखवलेला आहे. संस्कृत भाषा म्हणजे शुद्ध आणि श्रेष्ठ संस्काराने युक्त असलेली. मग असा प्रश्‍न निर्माण होतो की हे शुद्ध आणि श्रेष्ठ संस्कार कोणाकडून झालेले आहेत तर त्याचे उत्तर हेच असेल की हे संस्कार ईश्‍वराकडून झालेली अशी ती संस्कृत भाषा.आपण सर्वजण हे जाणतोच की भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठ वारसा जपणारे अनादी अनंतकाळापासून अस्तित्वात असलेल्या पृथ्वीचे, निसर्ग देवतांचे, निसर्गशक्तीचे शास्त्रोक्त वर्णन करणारे आपले वेदवाङ्‌मय व्याकरणशुद्ध संस्कृत भाषेतच आहे. या वैदिक संहितांचे पठण अनेक संस्कृत पाठशाळेतून अविरत चालू आहे. आधुनिक जगाला तर अचंबित करून टाकणारे गणित शास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, कृषीशास्त्र, जीवशास्त्र, धातुविज्ञान, नक्षत्रविज्ञान, ज्योति:शास्त्र, संगीतशास्त्र, नृत्यशास्त्र, शिल्पशास्त्र इत्यादी असंख्य शास्त्रे श्‍लोकबद्ध रूपात लिहिली गेली आहेत. ज्यामध्ये अद्भुत आणि अचंबित करणारे ज्ञान दडलेले आहे. आपले धार्मिक ग्रंथ संस्कृतबद्ध आहेतच परंतु आश्‍चर्य म्हणजे वैदिक धर्माला विरोध दर्शविणारे निरीश्‍वरवादी बौद्धादींचे मूळ ग्रंथही संस्कृत भाषेतूनच लिहिले गेले आहेत.
प्रत्येक मनुष्यमात्राचा सर्वांगीण विकास साधून अंतिम ध्येयापर्यंत नेणारे धर्म-अर्थ-काम आणि मोक्ष प्राप्त करवून देणारे ज्ञानविज्ञान संस्कृत भाषेतच लिखित आहे. वैदिक वाङ्‌मय आणि लौकिक वाङ्‌मयाचा आपल्यास अर्थबोध करवून घ्यायचा असल्यास निरंतर संस्कृत भाषेचे अध्ययन अत्यावश्यक आहे.
आपल्या वैदिक साहित्याला ‘अरण्यरुदितम्’ असे म्हणून पाश्‍चात्त्यांनी हिणवले आहे तर भारतीय संस्कृतीत व्याकरणदृष्ट्या शुद्ध असे साहित्य उपलब्ध नाही. भाषाविज्ञान म्हणजे काय हे तर भारतीयांना पाश्‍चात्त्यांनी शिकवले असे पाश्‍चात्त्यांचा पुरस्कार करणार्‍या तज्ञांकडून सतत आपल्या लेखनातून मांडले जाते. आणि आपण ते तेवढ्याच सहजपणे मान्यही करतो. परंतु खरोखरच असे आहे का याचा शोध घेण्याबाबत आपण भारतीय उदासीनता दाखवतो.
वस्तुत: वैदिक संहितेतील ऋचांचे अर्थ स्पष्ट करणारे अनेक व्याकरणपर ग्रंथ वैदिक काळापासूनच उपलब्ध आहेत. त्यातील ‘निघंटू’ नावाचा प्राचीन व्याकरणपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याचा केवळ आपल्याला नामपरिचय आहे. त्यानंतर विशेष प्रसिद्ध असलेला असा ‘निरुक्त’ नामक यास्काचार्यांचा ग्रंथ कठीण शब्दांचा व्याकरणशुद्ध अर्थबोध करून देणारा ग्रंथ आहे. अशा विशिष्ट ग्रंथाचा अभ्यास विशेषत: वैदिक संस्कृत पाठशाळेतूनच चालतो.
संस्कृत भाषेच्या पदविका अध्ययनामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या श्रेष्ठ व्याकरणकार महर्षी पाणिनी लिखित ‘अष्टाध्यायी’ या व्याकरण ग्रंथातील काही सूत्रांचा अभ्यास होताना दिसतो. महर्षी पाणिनीलिखित अष्टाध्यायीमध्ये व्याकरणाची चार हजार सूत्रे लिहिलेली आहेत. या अष्टाध्यायीमध्ये प्रावीण्य प्राप्त करणारेही अनेक पंडित आहेत.
महर्षी पाणिनीपूर्वी चौसष्ट व्याकरणकार होऊन गेले असा उल्लेखही सापडतो. पाणिनीप्रमाणे कात्यायन, वररूची, पतंजली इत्यादी वैयाकरण उत्तरोत्तर होऊन गेले. इसवी सन सातव्या शतकात राजाभर्तृहरीने ‘वाक्यपदीय’ नावाचा व्याकरण ग्रंथ आणि अन्य ग्रंथांचेही लेखन केले. त्यानंतर नागोजी भट्ट, भट्टोजी दीक्षित यांचा ‘सिद्धांत कौमुदी’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. इ. स. पूर्व तिसर्‍या शतकापासून भारतावर अनेक वेळा परकीयांची आक्रमणे झाल्याने अनेक भारतीय ग्रंथांचा नाश केला गेला. त्यामुळे इतिहासाला दृढता प्राप्त करून देणारे ग्रंथ आणि त्यांचे निर्माते यापासून आपण सर्वजण बरेच अनभिज्ञ राहिलो. आणि आपल्याकडे जाणून घेण्यासारखे बरेच काही आहे यापासून दूर राहिलो. भारतीय ज्ञान विज्ञानात संपूर्ण विश्‍वाला शास्त्रशुद्ध ज्ञानबोध करवून देण्याचे सामर्थ्य असतानाही भारतीयांना भाषेची उत्पत्ती कशी झाली? ध्वनिशास्त्र म्हणजे काय? भाषाशास्त्र म्हणजे काय याचे ज्ञान प्रथम पाश्‍चात्त्य भाषाविज्ञानानी दिले असे मत आपलेच काही तज्ञ मांडताना दिसतात. म्हणून हा किंचितसा उल्लेख.
आपल्या लौकिक साहित्याबाबतही असाच प्रचार होताना दिसतो. आपण भारतीय नाट्यकलेला जाणतच नव्हतो. तर नाट्यकला आपल्याला ग्रीकांनी दिली. ग्रीकांच्या नाट्यकलेमुळेच भारतीयांची नाट्यकला विकसित झाली. परंतु सत्य पहाता नाट्यकला आणि त्याचे गद्य-पद्यात्मक प्रकार ऋग्वेदापासून आपल्या वाचनात थोडेसे जरी आले तरी आपण आपल्या प्राचीन ग्रंथकारांना मनोमन आणि आदराने स्वाभिमानाने शतश: प्रणाम करू यात शंकाच नाही. नाट्यशास्त्रातील विविध बिंदूंचा अत्यंत बारकाईने या नाट्यशास्त्रात उल्लेख केलेला आहे. प्रगत रंगमंच प्राचीन काळातही कसे सुसज्ज होते याचे सचित्र वर्णन आढळते. रंगमंचावरील कोणत्या स्थानाचे रक्षण कोणती देवता करते याचे अत्यंत सुंदर आणि साक्षात्कारी वर्णन भरतनाट्यमशास्त्रात आढळते. उत्तर काळात रामायण आणि महाभारत या आर्यमहाकाव्यांना कवी भास, महाकवी कालिदास, माघ इत्यादी अनेक कवींनी आपल्या काव्यकथानकांना उपजीव्य म्हणून आधारभूत ठरवले. रामायण, महाभारत यातील उपकथा घेऊन अनेक प्रसिद्ध कवींनी आपल्या काव्यातून सहृदय वाचकांना आनंद तर दिलाच शिवाय धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषांचे दर्शन घडवले. आचार-विचार आणि व्यवहाराने शुद्ध अशा आपल्या प्राचीन कवीवर्यांच्या अद्भुत अशा काव्यकृतींचे रसग्रहण करून संस्कृत भाषेचे साक्षात्कारी दर्शन आपल्यास घ्यावयाचे असल्यास आपणास संस्कृत भाषेचे यथामती यथाशक्ती अध्ययन करावेच लागेल.
महाभारतातील सूक्तिप्रमाणे ‘यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न कर्हिचित्‌|’ वरील उक्तीचा अर्थ असा आहे : ‘जे जेथे आहे ते सर्वत्र आहे आणि जे जेथे नाही ते अन्यत्रही नाही.’ प्रत्येक भारतीयाने गर्व करावा असे सर्वच क्षेत्रातील अद्भुत सत्य सांगणारे ज्ञान आपल्या संस्कृत वाङ्‌मयात स्थित आहे.
‘संस्कृत भाषा’ ही आपल्या भारत वर्षाला ईश्‍वराकडून प्राप्त झालेली दिव्य अशी देणगी आहे. हे दिव्य दान आपल्या ठिकाणी असावे असा आग्रह प्रत्येकाने स्वत:शीच धरला पाहिजे. संस्कृत भाषेला सर्वत्र सन्मान अवश्य प्राप्त झालेला आहे. परंतु संस्कृत भाषेला प्राप्त झालेला हा शाब्दिक मान आहे. शिष्टाचाराची भाषा, धार्मिक कार्याची भाषा असे म्हणत तिला मर्यादित स्वरूपात स्थित न करता प्रत्येक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालयांमधून सन्माननीय स्थान शैक्षणिक संस्थांनी द्यावयास हवे.
आजच्या घडीला शाळा आणि विद्यालयांतून शंभरातून ५ ते १० विद्यार्थी संस्कृत हा विषय घेतात. त्यानंतर संस्कृत भाषेच्या पुढील अध्ययनात एखादाच विद्यार्थी रुची दर्शवितो. विज्ञानयुगाला अत्यावश्यक असलेल्या शास्त्रीय ज्ञानाचे भांडार असलेल्या संस्कृत भाषेचे अध्ययन न केल्याने आपलीच पुढील पिढी या दैवी भाषेपासून वंचित होईल. पराङ्‌मुख होईल. आपल्या सर्वांसाठी ही गोष्ट अत्यंत हानिकारक ठरेल.
देशविदेशांत संस्कृत भाषेचा सर्वार्ंथाने प्रचार आणि प्रसार करणारी ‘संस्कृत भारती’ ही संघटना गेली तीस वर्षे भारतभर संस्कृत भाषेचे कार्य अव्याहतपणे करीत आहे. संस्कृत भाषा मर्यादित न राहता लोकभाषा म्हणून उदयास यावी या एका नि:स्वार्थी हेतूनेच संस्कृत भारती हे कार्य करीत आहे. विविध संस्कृत प्रदर्शनांद्वारे प्राचीन ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ओळख सर्व जगताला करून देण्याचे कार्य संस्कृत भारती करीत आहे. संस्कृत भारतीद्वारे संपूर्ण गोमंतकात आणि बाहेरील राज्यांत चिन्मय आमशेकर, प्रसाद उमर्ये, महाबल भट्ट आदी ज्येष्ठ कार्यकर्ते संस्कृत भाषेच्या प्रचाराचे सेवाकार्य निरंतर बळावत आहेत. विविध उपक्रमांद्वारे संस्कृत शिकवण्याचे कार्य करीत आहेत. या संधीचा लाभ लहानापासून ज्येष्ठांनी घेतला पाहिजे. संस्कृत भाषेच्या अध्ययन छात्रवर्गाने रुची दर्शविली पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांप्रती तसा आग्रहही धरला पाहिजे. विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये संस्कृत अध्ययन आणि अध्यापनासाठी वाढ झाली पाहिजे. चुरस निर्माण झाली पाहिजे. संस्कृत भाषेतील विशाल ज्ञानोद्धी विद्यार्थ्यांसाठी मुक्त करून देण्याकरीता शाळांच्या मुख्याध्यापकांनी आणि महाविद्यालयांच्या प्रचार्यांनी विशेष सहकार्य करून संस्कृत भाषेच्या प्रचारकार्यास मार्ग मुक्त करून द्यावा.
उद्या पणजी कला अकादमीत संस्कृत भारतीच्या सहकार्याने अनेक मान्यवरांच्या उपस्थित संस्कृत संमेलन संपन्न होणार आहे. तद्प्रति विनम्रभाव व्यक्त करण्यासाठी हा लेखप्रपंच!