ईव्हीएमवरून इंडिया आघाडीत मतभेद

0
4

>> नॅशनल कॉन्फरसनंतर आता तृणमूलकडूनही ईव्हीएमवर विश्वास; काँग्रेसला दाखवला आरसा

हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमवर खापर फोडायला सुरुवात केली आहे. अनेक नेत्यांनी तर पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. मात्र, याच मुद्द्यावरुन इंडिया आघाडीत दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून आरोपांचे सत्र सुरू केलेल्या काँग्रेसकडे इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी पाठ फिरवली आहे. नॅशनल कॉन्फरन्सनंतर काल तृणमूल काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट करत ईव्हीएमवर विश्वास दाखवला.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी काँग्रेससह त्यांच्या इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्षांना एक सल्ला दिला होता. या लोकांनी (इंडिया आघाडीतील पक्ष) ईव्हीएमची तक्रार करणे थांबवायला हवे आणि निवडणुकीचा जो काही निकाल समोर आला आहे तो स्वीकारायला हवा. मतदान यंत्रणेवर विश्वास नसेल तर या पक्षांनी निवडणूक लढवू नये. मतदानयंत्रात समस्या असतील तर विरोधी पक्षांनी आपल्या ‘ईव्हीएम’ विरोधामध्ये सातत्य ठेवावे. नुसते आरोप करून त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, हे लक्षात घ्ययला हवक. निवडणूक जिंकल्यावर मूग गिळून गप्प बसायचे आणि पराभव झाल्यावर ईव्हीएमवर संशय व्यक्त करायचा हे चुकीचे आहे, असेही अब्दुल्ला म्हणाले.

अब्दुल्लांनी आपला मित्रपक्ष काँग्रेसला ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’वरून (ईव्हीएम) सुनावले आहे. याबाबत भाजपच्या सुरात सूर मिसळून अब्दुल्ला म्हणाले, तुम्ही जिंकलात की ‘ईव्हीएम’वर टीका करत नाही आणि पराभूत झाल्यावर ईव्हीम’ला दोष देता. त्यामुळे मला कळत नाही की तुम्ही निवडणुकीचे निकाल का स्वीकारू शकत नाही? ओमर अब्दुल्ला यांच्या या नव्या वक्तव्यावरून त्यांचा पक्ष ‘नॅशनल कॉन्फरन्स’ हा काँग्रेसवर नाराज असल्याचे उघड झाले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष आणि काँग्रेसची आघाडी होती. मात्र, हरियाणा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त करत या निवडणुकांच्या निकालाबाबत शंका व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते कागदी मतपत्रिका पुन्हा वापरात आणण्याची मागणी करत आहेत.

‘पीटीआय’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ओमर अब्दुल्ला म्हणाले, याच ‘ईव्हीएम’ मशीनच्या जोरावर तुम्हाला लोकसभा निवडणुकीत शंभरपर्यंत जागा मिळाल्या, तेव्हा तुम्ही विजय मिळाल्याप्रमाणे उत्सव साजरा केला होता. त्यानंतर काही महिन्यांनी तुम्हाला लोकसभेप्रमाणे अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून तुम्ही आता ‘ईव्हीएम’ला दोष देत आहात. निवडणुकीचे निकाल नेहमी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच लागतील असे नाही.

ईव्हीएमवरील आरोप बिनबुडाचे : तृणमूल
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीदेखील काँग्रेसचे ईव्हीएमवरील आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. सोमवारी संसद भवन संकुलात प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांकडे याचे पुरावे असतील, तर त्यांनी ते निवडणूक आयोगाकडे सादर करावे. अशा आरोपांमध्ये काही तथ्य नाही, असे मला वाटते. अजूनही कोणाला वाटत असेल की, ईव्हीएम हॅक होऊ शकते, तर त्यांनी निवडणूक आयोगाला सिद्ध करुन दाखवावे अन्यथा असे निरर्थक विधाने करुन काहीही होणार नाही, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

अब्दुल्ला हे मुख्यमंत्री होताच बदलले : काँग्रेस
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा ईव्हीएमवर विश्वास असल्याच्या वक्तव्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली. ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री होताच बदलले आहेत, असे काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी म्हटले आहे. विरोधकांकडून उपस्थित होत असलेल्या मुद्द्यांकडे त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे, त्यांनी वस्तुस्थिती तपासावी, असेही त्यांनी म्हटले आहे.