ईडीचे गोव्यासह 6 ठिकाणी छापे

0
2

हणजूण कोमुनिदाद जमीन हडपप्रकरणी कारवाई

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) यशवंत सावंत व इतरांशी संबंधित हणजूण कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणात गोवा, नवी दिल्ली, चंदीगडसह सहा ठिकाणी छापे घालून सुमारे दीड लाख अमेरिकन डॉलर्सची क्रिप्टो करन्सी आणि इतर दस्तऐवज जप्त केला आहे.

ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणामध्ये कारवाई करताना थिंकिंग ऑफ यूचे भागीदार उमर जाहूर शाह, नीरज शर्मा, पर्पल मार्टिन एंटरटेनमेंटचे राजेश कुमार यांच्यावर कारवाई केली आहे. यापूर्वी ईडीने यापूर्वी घातलेल्या छाप्यात अनेक महागड्या कारगाड्या व इतर दस्तऐवज हस्तगत केलेला आहे.

सक्तवसुली संचालनालयाने 10 ऑक्टोबर 2025 रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए)च्या तरतुदींनुसार गोवा, नवी दिल्ली, चंदीगड व इतर ठिकाणी शोधमोहीम राबवली. मेसर्स थिंकिंग ऑफ यूचे भागीदार उमर झहूर शाह आणि नीरज शर्मा आणि मेसर्स पर्पल मार्टिनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राजेश कुमार यांच्या जागेवर छापे टाकण्यात आले. यात ईडीला अंदाजे 1.5 लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे 1.25 कोटी) किमतीच्या क्रिप्टोकरन्सी असलेले क्रिप्टो वॉलेट सापडले असून ते गोठवण्यात आले आहेत. तसेच, ईडीने विविध जमिनींंमध्ये बेहिशेबी रोख गुंतवणूक दर्शविणाऱ्या नोट्स आणि डिजिटल रेकॉर्ड देखील जप्त केले.

गोवा पोलिसांनी यशवंत सावंत आणि इतरांविरुद्ध हणजूण येथील सर्वे क्रमांक 496/1-ए येथील जमीन हडप प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. जमीन हडप करण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरून जमीन आपल्या नावावर केली आणि नंतर त्यातील काही भाग तृतीय पक्षांना विकली आहे. ईडीकडून या कथित घोटाळ्यात सहभागी असलेल्या पैशांचा शोध घेण्यासाठी आणि इतरांची ओळख पटविण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.