ईडीकडून गोव्यात तिघांची 11.82 कोटींची मालमत्ता जप्त

0
33

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तीन व्यक्तींच्या गोव्यातील 8 स्थावर मालमत्तांवर जप्ती आणली आहे. ह्या मालमत्ता 11.82 कोटी रुपये एवढ्या किमतीच्या आहेत. इस्तेव्हन डिसोझा, मोझेस फर्नांडिस व समीर कोरगावकर यांच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या. ह्या मालमत्ता गोव्यातील असून, मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी ह्या मालमत्तांवर जप्ती आणली आहे.

पर्वरी पोलीस व आर्थिक गुन्हे पोलीस विभागाने एफआयआर नोंद केलेल्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने ही कारवाई केली आहे. हा एफआयआर हा राज्यात झालेल्या जमीन घोटाळा प्रकरणाशी संबंधित होता. दुसऱ्यांच्या जमिनी बळकावून नंतर त्या जमिनी आपल्याच असल्याचे भासवून त्या विकून फसवणूक केल्याप्रकरणी हे एफआयआर दाखल करण्यात आले होते. ज्या जमीनमालकांचे मृत्यू झाले आहेत किंवा ज्यांचे वारस नाहीत अथवा कायदेशीर वारस हे विदेशात राहत आहेत अशा जमिनींचा शोध घेऊन संशयितांनी जमिनी हडप केल्या.