>> परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेशावरून कारवाई
विदेश व्यवहार मंत्रालयाने काल एका आदेशाद्वारे वादग्रस्त इस्लाम प्रचारक झाकीर नाईक याचा पासपोर्ट रद्द केला आहे.
दहशतवाद्यांना पैशांची मदत केल्याच्या आरोपाप्रकरणी तपासकामासाठी एनआयएसमोर उपस्थित न राहिल्यामुळे विदेश व्यवहार मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. या आरोपांमुळे झाकीर नाईक भारताबाहेर आहे.
एनआयएच्या विनंतीवरून विदेश व्यवहार मंत्रालयाने झाकीरचा पासपोर्ट रद्द करण्यासंदर्भातील प्रक्रिया काही दिवसांपूर्वी सुरू केली होती. मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागळे यांनी या संदर्भात दुजोरा दिला.
बांगला देशची राजधानी ढाक्यातील एका रेस्टॉरंटमधील स्फोटानंतर काहींनी झाकीर याच्या प्रवचनांमधून दहशतवादी कारवाईसाठी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले होते. त्यानंतर भारत सरकारने झाकीर याच्या इस्लामिक रिसर्च फौंडेशन या संस्थेवर बंदी घालून देणग्या घेण्यासाठी मज्जाव केला होता. या फौंडेशनला बेकायदा घोषित करण्यात आले होते.