चांद्रयान-3 ही मोहीम यशस्वी ठरल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आता सौरमोहीम हाती घेतली आहे. इस्रो आपले यान सूर्याच्या दिशेने पाठवणार आहे. आदित्य एल-1 असे या सौरमोहिमेला नाव देण्यात आले आहे. शनिवार दि. 2 सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे आदित्य एल-1 उपग्रह सूर्याच्या दिशेने पाठवला जाईल. सकाळी 11.50 वाजता हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने झेपावेल.
यावेळी इस्रोकडून आदित्य एल-1 मिशनचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी सामान्य नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे. श्रीहरीकोटा येथील लाँच व्ह्यू गॅलरीमधून थेट लाँचिंग अनुभवता येणार आहे.
या मिशनचे लाँचिंग थेट पाहण्यासाठी वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरुन (ट्विटरवरुन) नोंदणीची लिंक (https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRTION/index.jsp) दिली आहे.
एल-1, अंतर, उपकरणे अन् उद्देश
- इस्रो ‘एल 1′ म्हणजेच लॅगरेंज बिंदूच्या अभ्यासासाठी हे अवकाशयान पाठवणार आहे. ‘एल-1′ हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधील एक बिंदू आहे. तिथपर्यंत हे यान जाणार आहे.
- हा बिंदू पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे. म्हणजेच आदित्य एल-1 यान तब्बल 15 लाख किलोमीटर दूर जाणार आहे. येथे पोहोचण्यासाठी सुमारे 120 दिवस म्हणजे 4 महिने लागतील.
- पूर्णपणे भारतीय बनावटीचे हे अवकाशयान, असून, त्यात सात वेगवेगळी उपकरणे बसवण्यात आली आहेत.
- सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळे आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही मोहीम हाती घेतली आहे.