इस्रायल-हमास युद्धास 47 दिवसांनंतर विराम

0
7

>> हमासकडून 50 इस्रायली ओलिसांची; तर इस्रायलकडून 150 पॅलेस्टिनींची होणार सुटका

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला गेल्या 47 दिवस पूर्ण झाले असून, अजूनही इस्रायलने हमासवर हल्ले करणे थांबवलेले नाही. या युद्धाची झळ संपूर्ण गाझाला बसली आहे. मोठ्या प्रमाणावर झालेला नरसंहार पाहता आता 47 दिवसांच्या इस्रायल-हमास युद्धानंतर अखेर युद्धविराम झाला आहे. इस्रायली मंत्रिमंडळाने चर्चेनंतर हमाससोबतच्या युद्धात युद्धविराम मंजूर केला आहे. त्या बदल्यात हमास 50 इस्रायली ओलिसांची सुटका करेल, तर 50 ओलिसांच्या बदल्यात इस्रायल 150 पॅलेस्टिनी ओलिसांनाही सोडणार आहे. आजपासून टप्प्याटप्प्यात दोन्ही बाजूंनी नागरिकांची सुटका केली जाणार आहे.

पॅलेस्टाईनच्या ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोबरच्या सकाळी इस्रायलवर पहिल्यांदा क्षेपणास्त्र हल्ला केला होता. गाझापट्टीतून पहिल्या दिवशी इस्रायलवर 7 हजारांहून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर त्याच दिवशी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी युद्धाची घोषणा केली होती. त्यानंतर हमासच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझापट्टीतील 17 लष्करी तळ आणि 4 लष्करी मुख्यालयांवर हल्ला केला होता. दरम्यान, युद्धविरामानंतर आता काही तास गाझामध्ये तोफांचे आणि लढाऊ विमानांचे आवाज थांबतील. या युद्धात इस्रायलमध्ये किमान 1,200 नागरिक आणि सैनिक मारले गेले आहेत, तर इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये 11,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

30 मुले, 8 माता आणि 12 महिला
इस्रायल सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, हमास येत्या 4 दिवसांत या 50 ओलिसांची सुटका करेल. इस्रायलचा हा हल्ला पूर्णपणे थांबेल. अहवालानुसार, हमास ज्या 50 ओलिसांची सुटका करणार आहे, त्यामध्ये 30 मुले, 8 माता आणि 12 महिलांचा समावेश आहे. त्यांना 10 ते 12 च्या गटात सोडले जाईल.

इस्रायलही 150 पॅलेस्टिनींना सोडणार
50 इस्रायली ओलिसांच्या बदल्यात इस्रायल सरकार 150 पॅलेस्टिनी ओलिसांनाही सोडणार आहे. या 150 पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतेक पश्चिम किनारा आणि पूर्व जेरुसलेममधील रहिवासी आहेत. हे लोक इस्रायलच्या तुरुंगात बंद होते.