>> अमेरिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
>> इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी गंभीर आजारी
अमेरिकेने इराणला इस्रायलवर परत प्रतिहल्ला करू नये असे आवाहन केले आहे मात्र त्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत इराण इस्रायलवर प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत आहे. पश्चिम आशियात सुरू असलेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने अमेरिकेने इराणला हा इशारा दिला आहे. इस्रायलने शनिवारी इराणच्या लष्करी तळांवर हल्ला केला. यात इराणच्या क्षेपणास्त्र निर्मिती कारखाने इस्रायलने नष्ट केले आहे. 1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्राइलवर सुमारे 200 पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्याचा बदला म्हणून इस्रायलने 100 पेक्षा अधिक लढाऊ विमानांच्या मदतीने इराणच्या लष्करी तळावर हल्ला केला होता.
इस्रायलने इराणमधील अणूऊर्जा प्रकल्प आणि तेलसाठ्यांना लक्ष करण्यात आले नाही. या हल्ल्यानंतर अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी इराणला इस्रायलवर प्रतीहल्ला करू नका असा इशारा दिला मात्र या इशाऱ्याचा इराणवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. इराण या हल्ल्याचा सूड घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. इराण स्वत:च्या संरक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे इराणने स्पष्ट केलं आहे. इराणच्या धमकीनंतर मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणावर युद्ध भडकण्याचा धोका निर्माण झाला आहे.
इस्रायलचे प्रत्युत्तर
इराणच्या धमकीला इस्रायलने प्रत्युत्तर देताना जर इराणने इस्रायलवर पुन्हा हल्ला केला तर याची मोठी किंमत मोजावी लागेल, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे. यानंतर अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटननेही इराणला संघर्ष वाढवू नये, यासाठी बजावले आहे. तर इराणने स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार आपल्याला अधिकार असल्याचे सांगत सर्व पर्याय खुले असल्याचे म्हटलं आहे.
हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमधील पाच रहिवासी भागांवर रॉकेट डागल्याचे म्हटले आहे. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, शनिवारी सीमेवर 80 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यानंतर हिजबुल्लाहने इस्रायलने ताब्यात घेतलेला भाग रिकामा करण्याचा इशारा दिला. दरम्यान, इस्रायली सैन्याने दक्षिण बैरूतमध्येही नागरिकांना परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला आहे.
अयातुल्ला खोमेनी आजारी
इस्रायलवर हल्ल्याची तयार करत असलेल्या इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी गंभीर आजारी असल्याचे माहिती आहे. लवकरच ते आपला उत्तराधिकारी घोषित करण्याची शक्यता आहे. खामेनी यांचा मोठा मुलगा मोजतबा खामेनी (55) याची त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. खामेनी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कुणाची निवड केली जावी याचाही विचार इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स करत असल्याची माहिती आहे.
रुहोल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर 1989 पासून अयातुल्ला अली खामेनी इराणचे सर्वोच्च नेते म्हणून कार्यरत आहेत.