इस्रायलमधून भारतीयांची चौथी तुकडी दिल्लीत दाखल

0
3

इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारताने ऑपरेशन अजय हाती घेतले आहे. या मोहिमेखाली इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यात येत आहे. काल इस्रायलमधून भारतीयांची चौथी तुकडी दिल्लीत दाखल झाली असून त्याद्वारे 274 भारतीय सुखरुप मायदेशी परतले आहेत.
इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारताच्या ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन येणारे चौथे विमान रविवारी सकाळी नवी दिल्ली विमानतळावर पोहोचले. इस्रायलहून भारतात परतणाऱ्या प्रवाशांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात आली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी रविवारी सकाळी ट्विटरवरून ही माहिती दिली.

4500 जणांचा मृत्यू
इस्त्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या युद्धात आतापर्यंत 2215 पॅलेस्टिनींना आपला जीव गमावला आहे, जखमींची संख्या 8,714 आहे. मृतांमध्ये 700 मुलांचाही समावेश आहे. वेस्ट बँकमध्ये आतापर्यंत 50 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. हमासच्या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये मृतांची संख्या 1300 वर पोहोचली आहे, तर 3400 लोक जखमी आहेत.

गाझामध्ये राहणाऱ्यांना तीन तासांचा अवधी

हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली आणि आता इस्रायलने अंतिम इशारा देण्याची तयारी केली आहे. इस्त्रायलने गाझा पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना उत्तर गाझातून दक्षिणेकडे जाण्यासाठी 3 तासांचा अवधी दिला आहे. इस्रायलच्या सैन्याने सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, या परिसरात कोणतेही ऑपरेशन करणार नसल्याचे सांगितले होते. या काळात सर्व नागरिकांना उत्तर गाझा सोडून दक्षिणेकडे जाण्यास सांगितले. तात्काळ परिसर रिकामा करा, यानंतर आम्ही हल्ला करू, अशा सूचना इस्रायलच्या सैन्याकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे इस्रायल लवकरच गाझा पट्ट्यात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे.

भारतीय वंशाच्या 3 महिलांचा मृत्यू

या युद्धामध्ये भारतीय वंशाच्या तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. यामधील एक महिला ही मूळची महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राच्या किम डोकरकर या महिलेचा या युद्धादरम्यान मृत्यू झाला. किम डोकरकर या इस्रायली सैन्यात त्यांचे कर्तव्य बजावत होत्या. त्याच दरम्यान त्यांना वीरमरण आले. दुसरी महिला ही इस्रायलच्या पोलीस दलात कार्यरत होती. यामधील एका महिलेची अद्यापही ओळख पटलेली नाही.