इस्रायलने युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळला

0
5

>> लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहशी सर्व ताकदीनिशी लढणार; इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 700 हून अधिक ठार

लेबनॉनवरील हवाई हल्ले थांबवून 21 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करावी, असा प्रस्ताव युरोपिअन युनियन, अमेरिका, फ्रान्स आणि अन्य काही मित्रराष्ट्रांनी इस्रायल सरकारला दिला होता; मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी काल हा प्रस्ताव फेटाळून लावला. या संदर्भात इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आलेी. याउलट हिजबुल्लाहशी सर्वशक्तिनिशी लढण्याचे आदेश इस्रायल सरकारने लष्कराला दिले आहेत. दरम्यान, काल बेरूतच्या उपनगरातील एका अपार्टमेंट इमारतीवर इस्रायने केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा ड्रोन कमांडर ठार झाला. मोहम्मद हुसेन सु्रर उर्फ अबू सालेह असे ठार झालेल्या कमांडरचे नाव आहे.

लेबनॉन आणि इस्रायलमध्ये गेल्या 8 दिवसांत हल्ले वाढले आहेत. त्यामध्ये 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली लष्कर लेबनॉनमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत मध्यपूर्वेत आणखी एका युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.

या आठवड्यात हिजबुल्लाहवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 700 हून अधिक ठार आणि हजारो विस्थापित झाल्यानंतर लेबनॉनमधील लढाई 21 दिवसांसाठी थांबवण्याची संयुक्त मागणी युरोपियन युनियन, अमेरिका, फ्रान्स आणि अनेक अरब राज्यांसह इतर मित्र राष्ट्रांनी बुधवारी केली होती. अमेरिका आणि फ्रान्सने लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याचा प्रस्ताव इस्रायल सरकारला दिला होता. युद्धविराम घोषित करून चर्चेतून मार्ग काढावा, अशी विनंती दोन्ही देशांकडून करण्यात आली होती. या प्रस्तावाला ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सौदी अरेबिया तसेच काही युरोपीय देशांनी समर्थन दिले होते; मात्र काल इस्रायलने हा प्रस्ताव नाकारला. इस्रायलचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल हर्झी हेलेवी यांनी बुधवारी सैनिकांना हिजबुल्लाविरुद्धच्या संभाव्य जमिनीवरील हल्ल्याची तयारी करण्यास सांगितल्यानंतर युद्धविरामाचा हा प्रस्ताव देण्यात आला होता.

दरम्यान, इस्रायल आणि लेबनॉन 2006 पासून एकमेकांवर हल्ले करत आहेत. गेल्या आठवड्यात लेबनॉनमध्ये झालेल्या पेजर आणि वॉकी-टॉकीच्या स्फोटानंतर हा हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेजरच्या स्फोटानंतर लेबनॉननेही इस्रायलवर क्षेपणास्र डागली होती. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही लेबनॉनवर हल्ला केला.

लेबनॉन सोडा; भारतीयांना सूचना
लेबनॉनमधील युद्धसदृश परिस्थितीबाबत भारत सरकारने एक नवीन सूचना जारी केली आहे. बेरूतमधील भारतीय दूतावासाने येथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना त्वरित देश सोडण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर लोकांना अत्यंत सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी दूतावासानेही लोकांना तेथे जाण्यास मनाई केली होती.

हिजबुल्लाहला संपवणे हेच लक्ष्य : कॅट्झ
इस्रायलचे परराष्ट्रमंत्री कॅट्झ यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका आणि फ्रान्सने युद्धाविराम करण्यासंदर्भात दिलेला प्रस्ताव इस्रायलने फेटाळला आहे. जोपर्यंत हिजबुल्लाहला संपवण्याचे आमचे लक्ष्य पूर्ण होणार नाही, तोपर्यंत उत्तर लेबनॉनवरील आमचे हल्ले सुरू राहतील. हिजबुल्लाहशी आम्ही सर्वशक्तिनिशी लढत राहू, असे कॅट्झ म्हणाले.

युद्धविरामाबद्दलच्या बातम्या खोट्या
इस्रायलने गुरुवारी लेबनॉनमधील हिजबुल्लाहबरोबर युद्धविराम प्रस्ताव नाकारला. त्याचबरोबर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने युद्धविरामाबद्दलच्या बातम्यांना खोटे म्हटले आहे. अमेरिका-फ्रान्सने दिलेल्या प्रस्तावाला पंतप्रधानांनी प्रतिसादही दिला नाही, असे नेतान्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.