इस्रायलचा मशीद, शाळांवर हल्ला, 26 जणांचा मृत्यू

0
3

इस्रायल-हमास संघर्षाला आज 7 ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र हे युद्ध अद्याप सुरूच असून संघर्ष अधिक तीव झालेला आहे. काही दिवसांपूर्वी इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे तर या भागात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असून आता इस्रायलने पुन्हा एकदा गाझामधील हल्ले सुरू केले आहेत.
इस्रायलच्या लढाऊ विमानांनी मध्य गाझामधील दैर-अल-बालाहमधील मशीद आणि विस्थापितांना आश्रय देणाऱ्या शाळेवर हल्ला केला असून, यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हमासच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

या हल्ल्यात किमान 20 जण जखमीही झाल्याचे डॉक्टर आणि हमासच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले. या मशिदीत विस्थापित लोक राहत होते.
इस्रायलने मात्र हमास कमांडच्या तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. पॅलेस्टिनी माध्यमांचे म्हणणे आहे की, उत्तर गाझामधील जबालियाजवळील बैत लाहिया शहरात इस्त्रायलने जोरदार बॉम्बहल्ला केला, यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला शस्त्र पुरवठ्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवावा आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम व्हावा, असे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं होते. त्यांच्या या मागणीचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी निषेध केला आहे.
नेतन्याहू यांनी, आज इस्रायल संस्कृतीच्या शत्रूंविरुद्ध सात आघाड्यांवर लढत स्वतःचे संरक्षण करत आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हत्या, बलात्कार आणि लोकांना जिवंत जाळणाऱ्या हमासविरोधात आम्ही लढत असल्याचे त्यांनी सांगितले.