>> अन्न, पाणी, वीज आणि इंधन पुरवठा बंद
गेल्या दोन दिवसांपासून इस्रायल व हमास यांच्यात घमासान युद्ध चालू आहे. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचे जीव गेले असून, असंख्य नागरिक जखमी झाले आहेत. गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच आहेत. त्यापाठोपाठ आता इस्रायलने काल एक मोठा निर्णय घेतला. इस्रायलने संपूर्ण नाकेबंदीचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार गाझाचा अन्न, पाणी, वीज आणि इंधन पुरवठा बंद केला जाणार आहे. त्यामुळे हमासची गाझा पट्टीत चांगलीच कोंडी होणार आहे.
शनिवारी सकाळी हमासने हजारो क्षेपणास्त्रे गाझा पट्टीतून इस्रायलच्या भूमीवर डागली. यापाठोपाठ इस्रायलने युद्धाची घोषणा करत हमासवर प्रतिहल्ला चढवला. या युद्धात इस्रायलचे 800 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत, तर 2150 जण जखमी झाले आहेत. तसेच इस्रायलच्या हल्ल्यात 500 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मृत्यू पावले आहेत.