भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) २०२१ मधले पहिले प्रक्षेपण यशस्वीरित्या करताना काल रविवारी १८ उपग्रह अवकाशात पाठवले. काल रविवारी सकाळी १०.२४ वाजता श्रीहरीकोटा, सतीश धवन स्पेस सेंटर (एसडीएससी) येथून हे प्रक्षेपण झाले. यात ब्राझीलचा ऍमेझोनिया -१ हा प्राथमिक उपग्रह आहे आणि इतर १८ उपग्रह आहेत. आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या पहिल्या लॉन्चपॅडवरून हे प्रक्षेपित करण्यात आले. या उपग्रहाला सतीश धवन उपग्रह किंवा एसडी सॅट असे नाव देण्यात आले असून ते २५,००० लोकांची नावे अंतराळात पाठवणार आहे. नॅनो सॅटेलाइटमध्ये भगवद्गीतेची एक प्रत एसडी कार्डच्या रूपात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वरच्या पॅनेलवर कोरले असून हा त्यांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमासाठी आणि अवकाश खासगीकरणासाठीच्या योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा प्रयत्न आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. शिवन आणि वैज्ञानिक सचिव डॉ. आर उमामहेश्वरन यांची नावे तळावरील पॅनेलवर कोरलेली आहेत.
प्रक्षेपणानंतर इस्रोचे प्रमुख के. शिवन ब्राझिलियन संघाचे अभिनंदन केले. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्त्रो आणि ब्राझीलचे अभिनंदन केले आहे.