केंद्राने मागितले स्पष्टीकरण, एनएसओ ग्रुपविरोधात गुन्हा
इस्रायलच्या स्पायवेअर पिगाससच्या माध्यमातून भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याप्रकरणी केंद्र सरकारने व्हॉट्सऍपला ४ नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्यास बजावले आहे. भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची या धोकादायक स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याचे व्हॉट्सऍपने कबूल केल्यानंतर त्यांचा त्यावर खुलासा मागण्यात आला आहे.
किती भारतीयांची हेरगिरी करण्यात आली, हे व्हॉट्सऍपने सांगितलेले नाही. याबाबत व्हॉट्सऍपने म्हटले आहे की, इस्रायली स्पायवेअर पेगाससच्या माध्यमातून हॅकर्सने हेरगिरीसाठी सुमारे १४०० लोकांचे फोन हॅक केले आहेत. चार खंडांतील व्हॉट्सऍप युजर्स याचे शिकार झाले आहेत. यामध्ये राजकीय व्यक्ती, पत्रकार, वरिष्ठ सरकारी अधिकार्यांचाही समावेश आहे.
इस्त्रायलच्या स्पायवेअर पिगाससद्वारा भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्यात येत असल्याचे व्हॉट्सऍपने गुरुवारी मान्य केले होते. तसेच हे टुल तयार करणार्या एनएसओ ग्रुपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही व्हॉट्सऍपने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही ट्विट करून व्हॉट्सऍपकडून हेरगिरीप्रकरणी खुलासा मागितल्याचे सांगितले आहे. हॅकर्सनी एक स्पायवेअर तयार केले असून त्याच्या माध्यमातून व्हॉट्सऍपचा डेटा ऍक्सेस केला जातो. एका इस्त्रायली सॉफ्टवेअर कंपनीने हे स्पायवेअर डिझाईन केले आहे. एनएसओ समूहाने हे टूल तयार केले आहे. एनएसओ समूहाने १,४०० यंत्रांमध्ये (मोबाइल) धोकादायक मालवेअर घुसवून संबंधित व्हॉट्सऍपमधील माहिती चोरली आहे. इस्रायली तंत्रज्ञान समूहाने काही मोबाइलधारकांची व्हॉट्सऍप माहिती चोरून त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे व्हॉट्सऍपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनीही स्पष्ट केले. यात व्हिडिओ कॉल येतात व त्यातून मालवेअर व स्पायवेअर मोबाईलमध्ये सोडले जातात. एनएसओ समूहाने संयुक्त अरब अमिरातीतील एका कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्यासाठी मदत केली होती, पीगॅसस हे सॉफ्टवेअर वापरकर्त्यांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडून सगळीच माहिती काढून घेते.
दरम्यान, या प्रकरणी मुख्य विरोधी पक्ष कॉंग्रेसने सरकारवर हल्लाबोल करत सुप्रीम कोर्टाकडे या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी केली.