‘इलेक्ट्रिक वाहनांसाठी’चे 25 कोटी रुपये गेले कुठे? : सरदेसाई

0
5

इलेक्ट्रिक वाहनांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याच्या हेतूने राज्य सरकारने अर्थसंकल्पात ज्या 25 कोटींच्या निधीची तरतूद केली होती, ते पैसे कुठे गेले, असा सवाल गोवा फॉरवर्डचे प्रमुख तथा फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल केला. इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठीची स्टेशन्स सुरू करण्यात राज्य सरकारला अपयश आल्याने संतप्त बनलेल्या सरदेसाई यांनी काल ट्विटरद्वारे प्रश्न उपस्थित केला.

इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठीची चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात अंदाजे 20 लाख रुपये एवढा खर्च येतो; मात्र ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी राज्यात कुणीही पुढे येत नसल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केलेल्या विधानानंतर सरदेसाई यांनी सदर प्रश्न उपस्थित केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी अर्थसंकल्पातून इलेक्ट्रिक वाहनांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद केली होती. हा निधी कुठे गायब झाला, असा प्रश्न सरदेसाई उपस्थित केला. हा निधी एखादा सोहळा अथवा एखाद्या प्रकल्पाच्या नूतनीकरण्यावर तर खर्च करण्यात आला नाही ना, असा सवालही सरदेसाई यांनी विचारला.

विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या विकासावर भर देण्याऐवजी मंत्री ढवळीकर हे भलत्याच योजनांकडे सगळे लक्ष केंद्रित करीत असल्याचा आरोपही सरदेसाई यांनी केला.