इलेक्ट्रिक कार ः भविष्यातील पर्याय

0
33
  • शशांक मो. गुळगुळे

येत्या काही वर्षांत ५ ते ६ प्रकारच्या इलेक्ट्रिक्स कारस् बाजारात येण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी ही कार घेण्यासाठी दोन ते तीन वर्षे थांबावे, तोपर्यंत कारची जास्त मॉडेल्स उपलब्ध असतील. याशिवाय चार्जिंग स्टेशन्सची संख्याही वाढलेली असेल.

कारस् या इंधनावर चालतात. भारतात जेवढे इंधन लागते तेवढे उत्पादित होत नाही म्हणून आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर इंधन आयात करावे लागते. जर इलेक्ट्रिक कारस् फार मोठ्या प्रमाणावर वापरात आल्या तर देशाचा आयातीवरील खर्च कमी होईल व इंधनांवर चालणार्‍या कारस्‌मुळे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावर होते तेही होणार नाही. त्यामुळे सध्याचे केंद्र सरकार ‘इलेक्ट्रिक कारस्’ वापरात याव्या यासाठी प्रयत्नशील आहे.
प्रवासी कारस्‌चा वापर २०२५-२६ या वर्षापर्यंत १२ टक्क्यांपर्यंत व्हावा हे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. २०२० मध्ये या वर्षाच्या अगोदरच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारस्‌च्या रजिस्ट्रेशनमध्ये १०९ टक्के वाढ झाली, तर विक्रीत ३६१.७८ टक्के वाढ झाली. याचा अर्थ लोकांची इलेक्ट्रिक कारस्ला पसंती आहे. आता जबाबदारी सरकारची आहे. कारण इलेक्ट्रिक कारस्‌ना ‘चार्जिंग’ करावे लागते, जसे अन्य कारस्‌मध्ये पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी भरावे लागते. सध्या भारतात अशी चार्जिंग सेंटर्स फारच कमी आहेत. त्यामुळे ती वाढविण्यावर सरकारला भर द्यावा लागेल. या कारस्‌साठी ज्या पायाभूत गरजा हव्यात त्या उभारण्यावर केंद्र सरकार/ राज्य सरकारने यांना भर द्यावा लागेल. या कारस् जास्त वापरात याव्यात म्हणून सरकारने ‘एफएएमई’ (फास्टर ऍडॉप्शन ऍण्ड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड ऍण्ड इलेक्ट्रिक व्हेहीकल) योजना सुरू केली आहे. याची सध्या (२०१९-२०२२) दुसरी ‘फेज’ चालली आहे. ग्राहक व कारस् उत्पादक या दोघांना आर्थिक फायदा व्हावा म्हणून ‘एफएएमई’ कार्यरत आहे. यासाठी केंद्र सरकारने हींींिी://ुुु.श-राीळीं.पळींळ.र्सेीं.ळप ही वेबसाईट सुरू केली आहे.

इलेक्ट्रिक कारसाठी कर्ज फक्त वैयक्तिक आयकर भरणार्‍यांना किंवा ‘प्रोपरायटर’ म्हणून व्यवसाय करणार्‍यांनाच संमत होऊ शकते. २०२१ च्या अर्थसंकल्पात असे घोषित करण्यात आले होते की, वैयक्तिक इलेक्ट्रिक कारस्‌ना १५ वर्षांनंतर ‘ग्रीनटॅक्स’ आकारला जाईल. हायब्रिड वाहनांवर कर आकारला जाणार नाही. दिल्ली व अन्य काही राज्यांत या प्रकारच्या कारस्‌वर ‘रोड टॅक्स’ व रजिस्ट्रेशन शुल्क आकारले जात नाही. या कारस् लोकप्रिय व्हाव्यात म्हणून ग्राहकांना खूश करण्याचे बरेच प्रयत्न केले जात आहेत. जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. या कारची किंमत मात्र इंधनावर चालणार्‍या कारपेक्षा जास्त आहे. विकत घेताना किंमत जास्त असली तरी हिचा इंधनावर कमी खर्च होतो. देखभाल खर्च कमी असतो, तसेच करात सवलती आहेत. याचाच विचार करता सुरुवातीस जास्त पैसे भरण्यास ग्राहक तयार होतात. ई-कार घरीही चार्जिंग करता येऊ शकते, पण ती जर सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर चार्ज केली तर खर्च कमी येतो. सध्यातरी चार्जिंग स्टेशन्सची संख्या फार कमी आहे, त्यात झपाट्याने वाढ व्हायला हवी.

बर्‍याच खाजगी व सार्वजनिक उद्योगातील कंपन्यांनी ‘स्टेशन नेटवर्क्स’ उघडली आहेत व अधिक उघडण्याचा प्रयत्न चालू आहे. पण ‘चार्जिंग स्टेशन्स’च भारतभर संपूर्ण जाळं उभं राहण्यास अजून किमान पाच वर्षे लागतील, असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे. ‘एफएएमई’च्या दुसर्‍या टप्प्यात ३५० चार्जिंग स्टेशन्स आतापर्यंत उभारली गेली आहेत. टाटा समूहाने आतापर्यंत देशपातळीवर एक हजार स्टेशन्स उभारली असून येत्या तीन वर्षांत आणखी दहा हजार स्टेशन्स उभारणार आहे. आयओसीएलची ४४८ इलेस्ट्रिक व्हेहीकल्स चार्जिंग स्टेशन्स असून, ३० बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स आहेत. कारमध्ये पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी काही मिनिटांत भरता येतो, तर घरी कार चार्ज करायला ६ ते ८ तास लागतात. जलद चार्जर असेल व मोठ्या आकाराची बॅटरी असेल तर ३५ ते ६० मिनिटांत ८० टक्के चार्जिंग होऊ शकते. चार्जिंग केल्यानंतर ती कार २०० ते ४०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. पण जागोजागी अजून चार्जिंग स्टेशन्स नसल्यामुळे सध्या तरी या कारस् लांबच्या प्रवासाला नेता येणार नाहीत. सध्या बाजारात फक्त ४ ते ५ प्रकारच्या कारस् व लक्झरी कारस्‌ही फक्त ५ ते ६ प्रकारच्याच उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांस निवडीस जास्त वाव नाही. येत्या काही वर्षांत ५ ते ६ प्रकारच्या कारस् बाजारात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्र शासनाने या कार उत्पादकांना आणखीन आर्थिक प्रोत्साहन दिल्यास यांचे उत्पादन वाढू शकेल. या कारना विम्याचा प्रिमियम जास्त भरावा लागतो. ग्राहकांनी ही कार घेण्यासाठी दोन ते तीन वर्षे थांबावे, तोपर्यंत कारची जास्त मॉडेल्स उपलब्ध असतील. याशिवाय चार्जिंग स्टेशन्सची संख्याही वाढलेली असेल.

१ एसी चार्जरने ही कार घरीही चार्ज करता येते. तसेच वॉलबॉक्स चार्जरने चार्ज करता येते. सध्या कार उत्पादक कंपन्या वॉलबॉक्स चार्जर फूकट बसवून देत आहेत. टाटा, एनर्जी ईफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, इंडियन ऑईल इत्यादी कंपन्यांची सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स सध्या आहेत. एकदा चार्जिंग केल्यावर कार २२० ते २८० कि.मी. धावू शकते. मोठी बॅटरी असेल तर ४०० कि.मी.पर्यंतचा प्रवास करू शकेल. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनवर चार्ज करायला ८० ते २२० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. जर घरी चार्जिंग केलं तर १६० ते ४५० रुपये खर्च येऊ शकतो. मुंबईत चार्जिंग स्टेशनवर प्रत्येक युनिटमागे १५ रुपये घेतले जातात. परिणामी चार्जिंगसाठी रुपये ३०० ते ६७५ इतका खर्च येऊ शकतो. बॅटरीची वॉरंटी ८ वर्षे किंवा १ लाख ६० हजार कि.मी.चा प्रवास इतकी असते. जवळचे चार्जिंग स्टेशन शोधायला ऍप आहे, तसेच वेबसाईटवरही ही माहिती मिळू शकते.

सध्या या प्रकारात-
१) टाटा नेक्सन ईव्ही ही पाचजण प्रवास करू शकणारी कार उपलब्ध आहे. किंमत रुपये १४ लाख २४ हजार ते १६ लाख ८५ हजार. जानेवारी २०२० मध्ये ही कार लॉंच झाली. २) एमजीझेडएसईव्ही ही पाचजणांसाठीची कार बाजारात उपलब्ध आहे. मूल्य रुपये २१ लाख ते रुपये २४ लाख ६८ हजार. जानेवारी २०२० मध्ये ही कार बाजारात आली. ३) ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक ही कार पाच सिटर असून, मूल्य रुपये २३ लाख ७९ हजार ते २३ लाख ९७ हजार इतके आहे. जुलै २०१९ मध्ये ही कार बाजारात आली. ४) टाटा टिगोर ईव्ही ही ५ सिटर असून मूल्य रुपये ११ लाख ९९ हजार ते १३ लाख १४ हजार आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये ही कार लॉंच झाली. ५) लक्झरी प्रकारातील मर्सिडिस ईक्युसी ४०० मॅटिक ही पाच सिटर कार असून मूल्य रुपये १ कोटी ६ लाख आहे. ऑक्टोबर २०२० पासून ही कार बाजारात आले. ६) जॅग्वार- पेरू ही कार ५ सिटर लक्झरी प्रकारातील असून मूल्य रुपये १ कोटी ५ लाख ते १ कोटी १२ लाख आहे. मार्च २०२१ मध्ये ही कार लॉंच केली. ७) लक्झरी प्रकारातील ऑडि-इ-ट्रॉन ही पाच सिटर कार असून याची किंमत रुपये १ कोटी ते १ कोटी १८ लाख आहे. जुलै २०२१ मध्ये ही कार लॉंच झाली. ८) येऊ घातलेली होंडा सिटी हायब्रिड ही कार पाच सिटर असून अपेक्षित मूल्य रुपये २२ लाख आहे. २०२२ च्या मध्यावर ही कार लॉंच होण्याची अपेक्षा आहे. ९) येऊ घातलेली महिन्द्रा एक्सयूव्ही ३०० इलेक्ट्रिक ही कार पाच सिटर एसयूव्ही असून अपेक्षित मूल्य रुपये १२ लाख आहे. २०२२ च्या अखेरीस ही कार बाजारात येईल. १०) वॉल्वो एक्ससी ४० रिचार्ज ही कार पाच सिटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून अपेक्षित मूल्य रुपये ६० लाख आहे. २०२२ च्या सुरुवातीस ही कार बाजारात येण्याची शक्यता आहे. वरील विद्युत वाहने सध्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. काही भविष्यात उपलब्ध होणार आहेत.