इराणला हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल : नेतन्याहू

0
6

इस्रायल आणि इराणमध्ये आता संघर्ष पेटला असून, मंगळवारी रात्री इराणने इस्रायलची राजधानी तेल अविववर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला मोठा इशारा दिला आहे. इराणने आमच्यावर क्षेपणास्त्र डागून गंभीर चूक केली आहे. त्यामुळे आता होणाऱ्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

मंगळवारी रात्री इराणने इस्रायलवर 200 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. मात्र, इस्रायलच्या म्हणण्यानुसार इराणने 180 क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
इस्त्रायल इराणच्या कृत्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हे स्पष्ट झाले आहे. इराणच्या कण्यावरच घाव घालण्याची तयारी सुरू केली आहे. ज्या तेलाच्या बळावर इराणच्या अर्थव्यवस्थेची संपूर्ण मदार आहे, तीच नष्ट करण्याची इस्रायलची योजना आहे.

इराणवर हल्ल्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असे इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सरकारकडून आदेश मिळताच क्षणात हल्ला केला जाईल. सर्वप्रथम इराणच्या ऑइल फॅसिलिटीला लक्ष्य केले जाईल. तेल विहिरी आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हल्ला केला जाईल. हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केली जाईल. त्यांच्या सैन्याला ज्या ठिकाणाहून शस्त्रे मिळतात, ती ठिकाणेही नष्ट केली जातील, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इराणच्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र प्रमुख (यून) अँटोनियो गुटेरेस यांनी निषेध व्यक्त न केल्याने इस्रायलने त्यांना देशात येण्यास बंदी घातली.

हिजबुल्लाहबरोबरच्या युद्धात 8 इस्रायली जवानांचा मृत्यू
इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेल्या भू-युद्धात बुधवारी इस्रायली सैन्य हे लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागातील मरून अल-रस गावाच्या 2 किमीच्या आत पोहोचले. समोरासमोर झालेल्या या लढाईत आतापर्यंत 8 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जखमी झाले आहेत.