इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले

0
18

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी कोसळले. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबदुल्लाहियानही होते. सदर हेलिकॉप्टर अद्याप बेपत्ता असून अझरबैजानच्या सीमेला लागून असलेल्या इराणमधील वर्जेघन शहरात ही घटना घडली.
राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्याशी आतापर्यंत कोणताही संपर्क झालेला नाही, असे इराणच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, खराब हवामानामुळे बचाव पथक घटनास्थळी पोहोचू शकलेले नाही. इराणमध्ये धुके आणि थंडीमुळे हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य करणे जवळपास अशक्य असल्याचे तेथील सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, रस्त्याने 20-40 पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. यामध्ये इराणच्या स्पेशल फोर्सच्या सदस्यांसह रेंजर्सचा समावेश आहे. त्यांच्याकडे तपासासाठी ड्रोन आणि श्वानपथकदेखील आहे.

रायसींच्या ताफ्यात 3 हेलिकॉप्टर
अध्यक्ष रायसी यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते, त्यापैकी दोन हेलिकॉप्टरमध्ये मंत्री आणि अधिकारी होते आणि ते सुरक्षितपणे इराणला पोहोचले. राष्ट्रपती हेलिकॉप्टरसोबत असताना परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबदुल्लाहियान तिथे होते. रायसी 19 मे रोजी सकाळी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासोबत धरणाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. सन 2021 मध्ये कट्टरतावादी नेता इब्राहिम रायसी इराणचे राष्ट्राध्यक्ष झाले. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यापूर्वीच इब्राहिम रायसी अनेक कारणांनी चर्चेत होते. ते सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या जवळचे मानले जातात. ते खोमेनी यांचे उत्तराधिकारी असतील असे मानले जात आहे.