इराणचा पाकिस्तानवर हवाई हल्ला

0
24

>> दहशतवादी तळ उद्ध्वस्त करताना लहान मुलांचा मृत्यू

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील जैश अल-अदल या दहशतवादी गटाच्या दोन महत्त्वाच्या तळांवर इराणने मंगळवारी रात्री उशिरा क्षेपणास्रे आणि ड्रोनने हल्ला चढवला. या हवाई हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून, तीन मुली जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)ने बलुचिस्तान प्रांतातील जैश अल-अदल या दहशतवादी गटाचे दोन तळ ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त केल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानने इराणने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.

पाकिस्तानमध्ये तळ ठोकून असलेल्या या दहशतवादी गटाने पाकिस्तानच्या सीमा भागांत इराणी सुरक्षा दलांवर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. जैश अल-अदलने इराणच्या दोन ठिकाणांवर हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने हल्ला केल्याचेही वृत्त आहे.
मेहर या इराणी सरकारी वृत्तसंस्थेनुसार, कुहे सब्ज भागात जैश अल-अदलचे तळ हे दहशतवादी गटाच्या सर्वात मोठ्या तळांपैकी एक आहेत. या तळांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने नष्ट करण्यात आले आहे.

या हल्ल्याबाबत पाकिस्तानने बुधवारी पहाटे निवेदन जारी केले. त्यानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्यामुळे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या हवाई हल्ल्यात दोन लहान मुले मारली गेली आणि तीन मुली जखमी झाल्या आहेत. ही घटना संपूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असेही पाकिस्तानच्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने हल्ल्याचे ठिकाण सांगितले नाही. दरम्यान, इराणच्या हल्ल्यांना बेकायदेशीर कृत्य म्हणून निषेध करून, पाकने तेहरानमधील इराणच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तीव्र निषेध नोंदवला असून, पुढील परिणामांची जबाबदारी पूर्णपणे इराणवर असेल, असे त्यात म्हटले आहे.