इम्रानचे सरप्राईज

0
25

पाकिस्तानी संसदेमध्ये सरकार अल्पमतात येऊनही आपले पंतप्रधानपद विरोधकांच्या हाती जाऊ नये म्हणून इम्रान खान यांनी काल जे काही केले ते कल्पनेच्या पलीकडचे होते. गेले काही दिवस आपले सरकार अल्पमतात आल्याने ते राजीनामा देणार असल्याच्या वावड्या उडत होत्या. काही दिवसांपूर्वी इम्रान यांनी जी जाहीर सभा घेतली, तेव्हा आपण क्रिकेट कप्तान होतो, त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार असल्याचा निर्धार व्यक्त केला होता खरा, परंतु पाकिस्तानी क्रिकेट संघाप्रमाणेच तेे राजकारणातही ते अशा प्रकारचा रडीचा डाव खेळतील अशी कोणाची अपेक्षा नव्हती. काल त्यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये चर्चेला आला, तेव्हा तेथे अनुपस्थित राहिलेले हे महाशय शेवटच्या क्षणी तरी निरुपायाने पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील अशीच सर्वांची अटकळ होती, परंतु आपण उद्या सरप्राईज देणार असे त्यांनी आधीच जाहीर केले होते, त्यामुळे हे सरप्राईज नेमके कोणते याबाबत उत्सुकताही होती. खरोखरीच इम्रान काल जी राजकीय खेळी खेळले, तिने काल सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यासाठी सभापतींचा व्यवस्थित दुरुपयोग करण्यात आला. आपल्याविरुद्ध विरोधकांनी गेल्या आठ मार्चला आणल्या गेलेल्या अविश्वास ठरावासंबंधी अमेरिकेने आधल्या दिवशीच सतर्क केले होते असे इम्रान यांनी आपल्या जाहीर सभेत सांगितले होते. त्याचीच री ओढत त्यांचे मंत्री फवाद चौधरींनी हा अविश्वास ठराव विदेशी शक्तींच्या पाठबळावर विरोधकांनी आणला असल्याचा दावा करीत तो चर्चेला न घेण्याची मागणी केली. लागलीच सभापतींनी ती ग्राह्य धरीत पाकिस्तानी घटनेच्या कलम पाचचा दाखला देत आपला निवाडा देताना विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव फेटाळून लावून संसदेचे कामकाजच स्थगित केले. हा धक्का पुरेसा नव्हता म्हणून की काय, लागलीच इम्रान यांनी संसद आणि सर्व प्रांतिक विधानसभा बरखास्त करण्याची व नव्याने निवडणुका घेण्याची शिफारस राष्ट्रपतींना केल्याचे टीव्हीवरून जाहीर केल्याने त्यांच्या पदत्यागाची वाट बघत बसलेल्या विरोधकांना अक्षरशः हात चोळत बसावे लागले. संसदेत धरणे धरण्यावाचून आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यापलीकडे त्यांच्या हाती काही उरले नाही.
इम्रान यांची खेळी खेळी अत्यंत चतुर व सुनियोजित होती यात शंकाच नाही. संसद बरखास्त झाली तरी निवडणुका होईपर्यंत हंगामी सरकार अस्तित्वात राहते. त्यामुळे अल्पमतात असूनही आपले पंतप्रधानपद त्यांनी राखले. संख्याबळ असूनही विरोधकांना सरकार स्थापनेची संधी मिळू दिली नाही. आता निवडणुकांना सामोरे जाताना बाह्य शक्ती आपले सरकार पाडायला निघाल्या होत्या याचे ढोल पिटत देशभक्तीचे भांडवल करायला इम्रान आणि त्यांचा तेहरिक ई इन्साफ पक्ष मोकळा झाला आहे. आपल्या धर्मनिष्ठेचा डांगोरा तर ते पिटत आले आहेतच. त्यामुळे येत्या निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यासाठी इम्रान देशभक्ती आणि धर्मभावनेचा पुरेपूर वापर करू पाहतील. तोवर आपल्याविरुद्ध कट रचणार्‍यांचा बंदोबस्तही करतील.
पाकिस्तानी राजकारणात सैन्याची लुडबूड फार असते. पाक लष्कराची या सार्‍या राजकीय घडामोडींत काय भूमिका राहणार, खरोखरीच ते तटस्थ राहणार का हे पाहावे लागेल. लोकांनी रस्त्यावर उतरावे असे आवाहनही इम्रान यांनी केले होते. म्हणजेच आपल्या समर्थकांना गरज भासल्यास हिंसाचार करून विरोधकांना नामोहरम करण्याची चिथावणीच इम्रान यांनी देऊन टाकली होती. संसदेतील नाटक तर पूर्वनियोजित होते हे फवाद चौधरींचे भाषण होताच सभापतींनी आपला लेखी निवाडा वाचून दाखवला त्यावरून सिद्धच झाले आहे. आता अविश्वास ठराव आलेला असताना सभापती संसदेचे कामकाज स्थगित करू शकतात का या मुद्‌द्यावरून विरोधक न्यायालयात गेले आहेत. परंतु इम्रान यांनी अमेरिकेने दिलेल्या पूर्वसूचनेचे निमित्त साधून अविश्वास ठरावाचे खापर ज्या तर्‍हेने अमेरिकेवरच फोडले, ते तो देश मुकाट सहन करणार का हेही पाहावे लागेल. अमेरिकी गुप्तचर यंत्रणेमार्फत मित्रराष्ट्रांच्या राजकारण्यांना अशा प्रकारच्या पूर्वसूचना दिल्या जात असतात. त्यात काही नावीन्य नाही, परंतु आपल्याला सावध करणार्‍यांनाच त्या खोड्यात अडकवून आपल्या मतदारांची देशभक्ती जागवून सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार मात्र प्रथमच घडला आहे. इम्रान यांनी तूर्त आपले पद वाचवले असले तरी त्यांना मिळालेला हा दिलासा तात्पुरता आहे. राजकीय खेळी करून त्यांनी विरोधकांवर मात केली खरी, परंतु पुन्हा निवडून येण्यासाठी कोणती खेळी खेळणार आणि तिला पाकिस्तानची जनता साथ देणार का हे आता पाहावे लागेल.