इबोलाची भीती

0
125

इबोलाग्रस्त आफ्रिकी देशांतून भारतात येणार्‍या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी करून आवश्यकता भासल्यास त्यांना थेट इस्पितळात भरती करण्याची व्यवस्था देशातील दिल्ली व मुंबई या प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवर करण्यात आली आहे. लायबेरिया, गिनिया, सिएरा लियॉन आदी छोट्या छोट्या आफ्रिकी देशांमध्ये इबोलाने सध्या उत्पात माजविलेला आहे. त्या देशांमध्ये अनिवासी भारतीय मोठ्या प्रमाणात राहतात, त्यामुळे साहजिकच हा फैलाव भारतात पसरण्याची भीती अनाठायी नाही. त्यामुळे त्यासंदर्भात खबरदारीची उपाययोजना आवश्यकच आहे. इबोलाबाधीत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण पन्नास ते नव्वद टक्के आहे, त्यामुळे जनमानसामध्ये त्याविषयी भीती दाटणे स्वाभाविक आहे. मात्र, यापूर्वी बर्ड फ्लू, सार्स आदींसंदर्भात देशात माजवला गेलेला हलकल्लोळ विचारात घेता, जनतेला भयभीत करण्याचा प्रयत्न करू दिला जाता कामा नये. आज सोशल मीडियाचा गैरवापर करून जनतेमध्ये इबोलाविषयी नाना अफवा पसरवण्याचे काम चालले आहे. याला सरकारने वेळीच आवर घालायला हवा. अशा प्राणघातक साथी जेव्हा येतात, तेव्हा भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशामध्ये त्याचा फैलाव झाला तर काय अनर्थ घडेल त्याची कल्पना करूनही अंगावर काटा येतो हे खरे असले, तरी केवळ भीती निर्माण करणे हा त्यावरील उपाय नव्हे. त्यातून काहीही साध्य होणार नाही. बर्ड फ्लूसंदर्भात अशीच भीती निर्माण केली गेली आणि त्यातून काही विशिष्ट फार्मास्युटिकल कंपन्यांनी आपल्या त्यावरच्या लशी सरकारच्या माथी मारून अब्जांची कमाई केली. ‘सार्स’संदर्भातही अशाच प्रकारचे आत्यंतिक भीतीचे वातावरण देशात निर्माण केले गेले होते. विदेशातून गोव्यात आलेल्या नुसत्या सर्दी – तापाच्या एका रुग्णाला सार्स झाल्याचे निदान एका डॉक्टर महाशयांनी केले आणि त्या रुग्णाला कडेकोट बंदोबस्तात इस्पितळात ठेवावे लागले. इबोलासंदर्भात खबरदारी निश्‍चितच आवश्यक आहे, परंतु नाहक गाजावाजा न करता शांतपणे त्यासंदर्भातील उपाय योजले गेले पाहिजेत. भारतामध्ये आरोग्यसेवेची स्थिती भयावह आहे. त्यामुळे इबोलासारख्या प्राणघातक विषाणूचा प्रसार रोखणे आवाक्याबाहेरचे आहे असे जनतेला वाटू शकते. परंतु याच आरोग्य यंत्रणेने निर्धार केला तर काय घडू शकते, ते पल्स पोलियोच्या मोहिमेतून देशाने अनुभवलेले आहे. त्यामुळे आरोग्य सेवेेचे योग्यरीत्या नियोजन केले गेले, तर इबोलावर नियंत्रण ठेवणेही अशक्य नसेल. या आजाराची लक्षणे सर्दी – तापाच्या सर्वसामान्य रुग्णांसारखीच आहेत ही खरी चिंतेची बाब आहे. ताप येणे, घशात खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी सामान्य वाटणारी लक्षणे असली तरी इबोलाच्या रुग्णाचा प्रसंगी एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो. त्याचा संसर्ग हवेतल्या हवेत होत नाही. केवळ मानवी स्त्रावांद्वारेच तो होत असतो, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणेही अशक्य नाही. इबोलाग्रस्त देशांतून भारतात येणार्‍या प्रवाशांची तपासणी विमानतळावर होत असली, तरी प्रत्यक्षात या विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणे दिसण्यास कधी कधी दोन – तीन आठवडेही लागतात. त्यामुळे घरोघरी जाणार्‍या या रुग्णांवर तीन आठवडे आरोग्याधिकार्‍यांकरवी लक्ष ठेवले जाणार आहे. सारे काही सरकारवर न सोडता, या प्रवाशांनीही आपल्या देशबांधवांच्या हिताचा विचार करून आरोग्याधिकार्‍यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. या विषाणूवर अद्याप लस आलेली नाही आणि एका लशीचा प्रयोग ज्या डॉक्टरवर झाला, त्याचा मृत्यू ओढवला. त्यामुळे भीती निर्माण होणे मनुष्यस्वभावाला धरून आहे. परंतु अफवा पसरवल्या जाता कामा नयेत. असा संकटांना तोंड देण्यासाठी सरकारने आरोग्यविषयक संशोधनाला अधिक चालना दिली पाहिजे. आपल्या देशात अशा विषाणूंच्या चाचणीसाठी पुरेशा सुविधादेखील नाहीत. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी किंवा दिल्लीच्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलवर आपण किती अवलंबून राहणार आहोत? खासगी क्षेत्राच्या सहकार्याने आरोग्यासारख्या मानवी जीवनाशी निगडीत अशा विषयावर व्यापक व सातत्यपूर्ण संशोधन व्हायला हवे. बुद्धिमत्तेची उणीव ही आपली समस्या नाही. या बुद्धिमत्तेला वाव मिळत नाही ही खरी समस्या आहे. खबरदारीचे उपाय प्रामाणिकपणे योजले गेले आणि नियोजनबद्ध रीतीने आपल्या आरोग्ययंत्रणेचा वापर झाला, तर इबोलाला अटकाव अशक्य नाही.