१५ हजारांचे उद्दिष्ट
यंदाच्या इफ्फी महोत्सवासाठी शुक्रवारपर्यंत ५४१२ प्रतिनिधींची नोंदणी झालेली असून प्रतिनिधींची संख्या १५ हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे गोवा मनोरंजन सोसायटीचे सरव्यवस्थापक श्रीपाद नाईक यांनी काल सांगितले.यंदा प्रतिनिधींकडून इफ्फीसाठी जोरदार प्रतिसाद असून २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या २० दिवसांत ५ हजारांवर प्रतिनिधींची नोंदणी होणे ही खरोखरच आनंददायी अशी बाब असून इफ्फीची लोकप्रियताच त्यातून दिसून येत असल्याचे नाईक म्हणाले.
कोकणी व मराठी चित्रपटांसाठी यंदा स्वतंत्र विभाग ठेवण्यात आलेला असून गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांना त्याचा फायदा मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या विभागासाठी चित्रपट सादर करण्याचा काल शेवटचा दिवस होता. दरम्यान, या विभागासाठी आवश्यक तेवढे पूर्ण लांबीचे चित्रपट मिळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून आल्याने या विभागासाठी लघुपटही मागवण्यात आलेले आहेत. या विभागासाठी येणार्या चित्रपटांची निवड करण्यासाठी स्वतंत्र निवड समिती नेमण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यानी दिली. गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या विभागाची स्थापना करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.