इफ्फीसाठी साधनसुविधांत वाढ, कृती योजना लवकरच : मुख्यमंत्री

0
145

उद्घाटन, समारोप शामाप्रसाद स्टेडियममध्ये
गोवा हे इफ्फीसाठीचे कायम स्थळ बनल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात इफ्फीसाठीच्या साधनसुविधांत आणखी कोणती वाढ करायला हवी त्यासाठीची कृती योजना १५ दिवसांत तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल गोवा मनोरंजन सोसायटीच्या सर्वसामान्य मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंडळाची बैठक काल पूर्ण होऊ न शकल्याने ती येत्या शनिवारी पुन्हा होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
अतिरिक्त चित्रपटगृहांसह इफ्फीसाठीच्या साधनसुविधांत बरीच वाढ करायची गरज असून कृती योजना तयार केल्यानंतर कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गोवा सरकारतर्फे इफ्फीसाठी दरवर्षी जो खर्च केला जातो तो यावेळी ५० टक्क्यांनी कमी केला जाईल. मात्र, तसे असले तरी प्रत्यक्षात कार्यक्रम कमी केले जातील किंवा कार्यक्रमांचा दर्जा खाली आणला जाईल असे नव्हे. शक्य असतील ते कार्यक्रम प्रायोजकांची मदत घेऊन केले जातील. त्यामुळे सरकारचा पैसा वाचेल. उद्घाटन व समारोप सोहळ्यासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून जसा भव्य शामियाना उभारला जात असे तसा यंदा उभारला जाणार नाही. उद्घाटन व समारोप सोहळा डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होईल. त्यामुळे शामियान्यावरील दीड कोटी रु. वाचणार असल्याचे पर्रीकर म्हणाले. हे स्टेडियम यापुढे परिषदा वगैरे घेण्यासाठी भाडेपट्टीवर देण्याबाबत सरकार विचार करीत आहे. त्यातून मोठा महसूल ईएसजीला मिळू शकेल. येत्या दोन वर्षांच्या काळात ईएसजीला स्वयंपूर्ण बनवण्याचा विचार असून त्यासाठी ईएसजीला अशाप्रकारे महसूल मिळवण्याचे मार्ग मोकळे करून देण्यात येणार असल्याचे पर्रीकर म्हणाले.
आयनॉक्सचा दर्जा वाढवणार
आयनॉक्स चित्रपटगृहांचा दर्जा वाढवण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र, ते काम येत्या इफ्फीनंतरच हाती घेण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. आयनॉक्सच्या भाड्यापोटी सरकारला मिळणारे पैसे ईएसजीला मिळतील. शिवाय आयनॉक्ससमोरच्या पार्किंगसाठी वर्षाला १८ लाख रु. ही ईएसजीला मिळणार आहेत, असे पर्रीकर यांनी सांगितले.