‘इफ्फी’त यंदा ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रपट

0
106

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) यंदा ५० वे वर्ष आहे, यानिमित्त गोव्यात २०-२८ नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या चित्रपट महोत्सवामध्ये ऑस्कर पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या चित्रपट महोत्सवामध्ये ‘ऑस्कर रिट्रोस्पेक्टिव्ह’ या शीर्षकाचे एक स्वतंत्र दालन असेल.

या दालनामध्ये मिशेल कर्टिज यांचा ‘कॅसाब्लांका’, व्हिक्टर फ्लेमिंग, बेन हर यांचा ‘गॉन विथ द विंड’, विल्यम वायलर यांचा ‘द बेस्ट इअर्स ऑफ अवर लाइव्हज्’, जोसेफ एल. मॅनकीविक्झ यांचा ‘ऑल अबाऊट इव्ह’, डेव्हिड लीन यांचा ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’, रॉबर्ट वाइज यांचा ‘द साउंड ऑफ म्युझिक’, फ्रान्सीस फोर्ड कोपोला यांचा ‘गॉडफादर’, जोनाथन डेम यांचा ‘द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’ आणि रॉबर्ट जेमेकिस यांचा ‘फॉरेस्ट गम्प’ या सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या सर्व चित्रपटांना ऑस्कर स्पर्धेत कोणत्या ना कोणत्या विभागात नॉमिनेशन मिळालेले आहे, तसेच पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. विशेष म्हणजे यापैकी काही चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले तर बहुतेक चित्रपट हे हॉलिवूड क्लासिक मानले जातात. असे दुर्मिळ पुरस्कारप्राप्त चित्रपट पाहण्याची संधी यंदाच्या ५० व्या ‘इफ्फी’मध्ये चित्रपट रसिकांना मिळणार आहे.

लघु फिल्म स्पर्धा
दरम्यान, गोवा मनोरंजन संस्थेने यंदाच्या सुवर्ण महोत्सवी इफ्फीनिमित्त मिनी मूव्ही मानिया लघु फिल्म स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा गोवा राज्य आणि राष्ट्रीय अशा दोन गटातून घेतली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी फिल्म निर्मात्यांना ७२ तासांत ५ ते ८ मिनिटांची फिल्म तयार करून सादर करावी लागणार आहे. गोवा मनोरंजन संस्थेकडून या स्पर्धेसाठी फिल्म निर्मितीसाठी विषय दिला जाणार आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

नव्या होतकरू सिने निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार यांना प्रोत्साहन देण्यासाठी लघु फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्‍यांनी दि. १५ नोव्हेंबर २०१९ पर्यत नोंदणी करणे आवश्यक आहे. लघु फिल्म निर्मितीसाठी दि. २३ नोव्हेंबरला ईएसजीच्या वेबसाइटवर विषय जाहीर केला जाणार आहे. लघु चित्रपट निर्मितीसाठी विषय जाहीर केल्यानंतर ७२ तासांत लघुचिपटाची निर्मिती करून संबंधितांकडे सादर केला पाहिजे. या स्पर्धेसाठी विविध गटांत एकूण ९ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत, असेही फळदेसाई यांनी सांगितले.
यंदाच्या सुवर्ण महोत्सवी इफ्फीनिमित्त राज्यात तालुका पातळीवर कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच कांपाल मैदानावर राज्य फिल्म प्रमोशन विभाग कार्यान्वित केला जाणार आहे, अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.

तालुका पातळीवर रवींद्र भवन किंवा अन्य ठिकाणी इफ्फीसाठी कार्यक्रम आयोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यासाठी साधन सुविधा उपलब्ध असलेल्या रवींद्र भवनामध्ये चित्रपटाचे स्क्रिनिंग केले जाणार आहे. पर्वरी येथे आयनॉक्समध्ये तीन चित्रपटगृहात चित्रपटांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे. या वर्षी महोत्सवात चित्रपटाची संख्या जास्त आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले. कांपाल येथील फिल्म प्रमोशन विभागात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील फिल्म शुटिंगबाबत माहिती आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

फिल्म प्रमोशन विभागात राज्यांना स्टॉल्स उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. फिल्मशी संबंधित इतर स्टॉल्ससुद्धा उभारण्यात येणार आहेत. मिरामार, आल्तिनो येथील जॉगर्स पार्क येथे सिनेमांचे स्क्रिनिंग व इतर कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. मांडवी नदीच्या किनार्‍यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.