![12nov copy.jpg12](https://navprabha.com/wp-content/uploads/2014/11/12nov-copy.jpg12.jpg)
नोव्हेंबर २० रोजीपासून पणजीत सुरू होत असलेल्या ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावेळी दोन सुपरस्टार – अभिताभ बच्चन व रजनीकांत – हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यामुळे हा अशाप्रकारचा दुर्मिळ योग असेल.बीग बी हे इफ्फीचे प्रमुख पाहुणे असतील तर रजनीकांत यांना खास शतक महोत्सवी पुरस्कारानेे सन्मानीत केले जाईल, अशी घोषणा काल केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी केली.
अभिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्याव्यतिरिक्त हॉंगकॉंगचे चित्रपटकर्ते वॉंग कार-वई यांना महोत्सवाच्या ११व्या दिवशी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येईल. त्यांचाच ‘दि ग्रँडमास्टर’ हा सिनेमा निरोपाचा सिनेमा असेल.
यंदाच्या इफ्फीत चीनवर खास झोत असेल, अशी माहिती त्यांनी दिली. चीन हॉलीवूडशी स्पर्धा करतोय. त्यांचे चित्रपट इफ्फीत सादर होतीलच. शिवाय चीन सिनेसृष्टीचे शिष्टमंडळ भारतीय चित्रपटकर्त्यांना भेटणार असून उभयतांत चर्चा होईल. भारत-चीनचा सिनेमात सहकार्याचा करार आहे. भारतीय सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित करण्याबाबत आशावादी आहोत, असेही मंत्र्यांनी सांगितले. इफ्फीची सुरुवात ‘दि प्रेसिडेंट’ या मोहसीन मखमलबफ यांच्या इराणी चित्रपटाने होईल.
यंदाच्या इफ्फीत दिवंगत कलाकार रिचर्ड ऍटनबर्ग, रॉबी विल्यम्स, जोहरा सेहगल, सुचित्रा सेन, सदाशिव अमरापुरकर, फारूख शेख, ए. के. नागेश्वर यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.
यंदाचे दादासाहेब फाळके पुरस्कारविजेते गुजझार यांचेही चित्रपट दाखविण्यात येतील.
इशान्य भारतसंबंधित विभागही असेल. यंदा या विभागात आठ इशान्येकडील राज्यांमधून महिला केंद्रित सिनेमा दाखवले जातील.
यंदाच्या महोत्सवात ७५ देश सहभागी होत आहेत. त्यांचे ६१ आंतरराष्ट्रीय व सात आशियाई सिनेमा सादर होतील.