>> केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
>> यंदाचा सोहळा हायब्रिड पद्धतीने
५२ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आजपासून राज्यात सुरू होत आहे. हायब्रिड पद्धतीने होत असलेल्या ह्या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळा बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार असून सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. २०२१ सालासाठीच्या ‘इंडियन फिल्म पर्सनलिटी ऑफ द इअर’ या पुरस्कारासाठी यंदा ड्रिमगर्ल म्हणून ओळखली जाणारी नामवंत हिंदी चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी व गीतकार प्रसून जोशी यांची निवड झाली आहे. तर मार्टीन स्कोरसेस व इस्तवान झाबो यांचा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार देऊन यंदाच्या इफ्फीत गौरव करण्यात येणार आहे. मात्र, हे द्वयी सोहळ्याला प्रत्यक्ष हजेरी लावू शकणार नसल्याने त्यांचा आभासी पद्धतीने गौरव करण्यात येणार आहे.
उद्याचे ७५ सर्जनशील फिल्म मेकर्स ह्या संकल्पनेखाली निवड झालेले ७५ युवा सर्जनशील फिल्म मेकर्स यंदाच्या इफ्फीत सहभागी होणार आहेत. त्यांना फिल्म मेकर्सबरोबर संवाद साधण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
ब्रिक्स चित्रपट महोत्सव
यंदा पहिल्यांदाच इफ्फी दरम्यान ब्रिक्स चित्रपट महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत चित्रपट अभिनेते दिलीप कुमार तसेच हल्लीच दिवंगत झालेले कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांच्यासह जेम्स बॉण्डची व्यक्तीरेखा सर्वात प्रथम रंगवणारे अभिनेते सीन कॉनरी यांनाही इफ्फीत श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. वर्षभरात दिवंगत झालेल्या चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना त्यांचे चित्रपट श्रद्धांजली विभागात दाखवून मानवंदना देण्यात येणार आहे.
यंदा इफ्फीत एकूण ७३ देशांतील १४८ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. त्यात १२ जागतिक प्रिमियर, ७ आंतरराष्ट्रीय प्रिमियर, २६ आशियाई प्रिमियर आणि ६४ भारतीय प्रिमियर यांचा समावेश असेल.
‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’ या कार्लुस सौरा यांच्या चित्रपटाने इफ्फीचा शुभारंभ होणार आहे. तर समारोप असगर फरहादी यांच्या ‘अ हिरो’ या चित्रपटाने होणार आहे. ब्रिक्स चित्रपट महोत्सवानिमित्त इफ्फीत पाच राष्ट्रांतील चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
उद्घाटनाला बॉलिवूडमधील
तारकांची मांदियाळी
आजच्या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, रणवीर सिंग, रितेश देशमुख, जेनिलिया देशमुख, श्रद्धा कपूर आदी मंडळी हजर राहणार आहेत. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर व मनीष पॉल हे करणार आहेत. आज २० रोजी सुरू होणार्या चित्रपट महोत्सवाचा समारोप २८ नोव्हेंबर रोजी होईल.