गेल्या २० रोजी सुरू झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आज होणार आहे. सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून दाक्षिणात्य अभिनेते जयराम सुब्रमण्यम् हजर राहणार असल्याचे गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष दामू नाईक यांनी काल सांगितले. बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पडुकोण ही देखील या सोहळ्याला हजर राहणार आहे. त्याशिवाय बॉलिवूडमधील एक ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी, अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्यासह बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपट कलाकार यांची मांदियाळी यावेळी असेल.
उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच समारोप सोहळाही बांबोळी येथील इनडोअर स्टेडियममधील सुमारे ५ ते ६ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत संध्याकाळी ४ वाजता सुरू होईल.
गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, राज्यपाल मृदुला सिन्हा, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील अधिकारी, चित्रपट महोत्सव संचालनालयातील अधिकारी आदी यावेळी हजर असतील. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली हे यावेळी हजर राहू शकणार नसल्याचे समजते.
यावेळी चीनमधील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक वॉंग कार वाय यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
महोत्सवातील स्पर्धा विभागातील चित्रपटांपैकी प्रथम पुरस्कारप्राप्त चित्रपटाला सुवर्ण मयुर तर द्वितीय पुरस्कार मिळणार्या चित्रपटाला रौप्य मयुर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेता व उत्कृष्ट अभिनेत्री आदी पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येतील.