‘इन टू द डार्कनेस’ला सुवर्ण मयुर

0
214

>> इफ्फीचा शानदार समारोप, अभिनेते विश्‍वजीत चटर्जी यांना भारतीय व्यक्तिमत्व पुरस्कार

काल रविवार दि. २४ रोजी समारोप झालेल्या ५१व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डोन्मार्कचा चित्रपट ‘इन टू द डार्कनेस्’ या एन्डर्स रेफ्‌न यांच्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयुर, प्रमाणपत्र व ४० लाख रु.चा पुरस्कार प्राप्त झाला. तर उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी असलेला रौप्य मयुर व १५ लाख रु.चा पुरस्कार तैवानचा चित्रपट ‘सायलंट फॉरेस्ट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक को येन निएन यांना मिळाला. उत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) पुरस्कार ‘वेलेंटिनो’ या चित्रपटासाठी कॅसियो पेरेरा द सांतोस यांना प्राप्त झाला. १५ लाख रु. व प्रमाण असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

विशेष ज्युरी पुरस्कार ‘फेब्रुवारी’ या कॅमेन कलेव्ह दिग्दर्शित बलगेरिएन चित्रपटाला प्राप्त झाला. १५ लाख रु. व रौप्य मयुर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर ज्युरीचा विशेष दखल पुरस्कार ‘ब्रिज’ या कृपाल कलिदा यांच्या आसामी चित्रपटाला मिळाला. उत्कृष्ट पुरुष अभिनेत्यासाठी असलेला पुरस्कार झू शुआन ली या अभिनेत्याला ‘द सायलंट फॉरेस्ट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला. तर उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पोलंडची अभिनेत्री सोफिया स्नाफिइएज हिला ‘नॅव्हर क्राय’ या चित्रपटासाठी देण्यात आला.

भारतीय व्यक्तिमत्त्व पुरस्कार
इफ्फीमध्ये मुख्यमंत्री सावंत व राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ज्येष्ठ चित्रपट अभिनेते विश्‍वजीत चटर्जी यांचा या वर्षीचे भारतीय व्यक्तिमत्व पुरस्कार देऊन सन्मान केला.
गांधी शांतता पुरस्कार
आयसीएफ्‌टीचा युनेस्को गांधी पदक पुरस्कार अरेबिक चित्रपट ‘२०० मिटर्स’ला मिळाला. अर्जेटिनाचे दिग्दर्शक पाब्लो सिजर यांच्या अध्यक्षतेखालील प्रसन्ना विथंगे (श्रीलंका), अबू बक्र शॉवली (ऑस्ट्रिया), प्रियदर्शन (भारत) व सुबायन हुसेन (बांगलादेश) या ज्युरी मंडळाने या पुरस्काराची निवड केली.
बांबोळी येथे श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानावर झालेल्या इफ्फीच्या समारोप सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून ज्यष्ेठ हिंदी चित्रपट अभिनेत्री झिनत अमान व विशेष पाहुणे म्हणून अभिनेते व खासदार रवी किशन हे हजर होते.
यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी जगभरात कोविड महामारी असतानाही गोव्यात इफ्फीचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याबद्दल चित्रपट महोत्सव संचालनालय व सरकारचे कौतुक केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, कोविड महामारीमुळे इफ्फीचे आयोजन कसे करावे असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. मात्र, त्यावर मात करीत इफ्फीचे यशस्वीरित्या आयोजन आम्ही केले. फेब्रुवारी महिन्यात राज्यात पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी सावंत यांनी दिली.
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो म्हणाले की, सगळ्या अडचणींवर मात करून इफ्फीचे यशस्वीरित्या आयोजन केल्याने आयोजक अभिनंदनास पात्र आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदी चित्रपट हे भारतासोबतच नेपाळ, बांगलादेश व अन्य काही शेजारी देशांतही पाहिले जातात. त्यामुळे ते देश व त्या देशातील लोकही भारताशी भावनीकरित्या जवळ आल्याचे सांगितले.
अभिनेत्री झिनत अमान यांनी, इफ्फीद्वारे चित्रपटांचे जादुई जग सर्वांसमोर खुले होण्यास मदत होत असल्याचे सांगितले. खासदार व अभिनेता रवी किशन यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरवात भारतीय चित्रपटांच्या ५० वर्षांच्या प्रवासाचा मागोवा घेणार्‍या गीताने व नृत्याने झाला. सूत्रसंचालन अभिनेत्री सिमॉन सिंग यांनी केले. समारोप सोहळ्यानंतर कला अकादमी व आयनॉक्स थिएटरांत ‘वाइफ ऑफ स्पाय’ हा समारोपाचा चित्रपट दाखवण्यात आला.