पणजी (प्रतिनिधी)
इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशनच्या गोवा विभागाचे अधिवेशन रविवार २१ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० यावेळेत नावेली, मडगाव येथील रोझरी महाविद्यालय सभागृहात घेण्यात येणार आहे, अशी माहिती इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशनच्या पुणे विभागाचे सरचिटणीस भालचंद्र केरकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
आयपीए गोवा हे आत्तापर्यंत इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशन पुणेचा भाग होता. मात्र, गोव्यातील सभासदांची संख्या वाढल्याने गोव्यात स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोवा विभाग ऑल इंडिया इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशनला थेट संलग्न केली जाणार आहे, असे केरकर यांनी सांगितले.
या अधिवेशनाचे उद्घाटन निवृत्त एअर कमांडर पीटर किथ पिंटो यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अ.भा. संघटनेचे सरचिटणीस टी. के. चक्रवर्ती, उपाध्यक्ष कॉ. नटराजन, पश्चिम प्रदेश संघटनेचे माजी अध्यक्ष रमेश पाटणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सामाजिक व इतर क्षेत्रात योगदान देणार्या रमेश गावस, राजेंद्र केरकर, पौर्णिमा केरकर, डॉ. सुबोध केरकर, नारायण केरकर यांचा सन्मान केला जाणार आहे, असेही केरकर यांनी सांगितले.
पेन्शनर्स असोसिएशन ही केवळ पेन्शनरांचाच विचार करणारी संघटना नसून तिला एक व्यापक सामाजिक दृष्टिकोन आहे. संघटनेच्या कानपूर अधिवेशनामध्ये सर्व भारतीयांना ६० वर्षानंतर पेन्शन मिळालीच पाहिजे यासाठी इतर संघटनांना बरोबर घेऊन देशभर या मागणीसाठी पेन्शन परिषदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे गोवा विभागाचे सरचिटणीस ए. पाशको यांनी सांगितले.