इंधन परवडत नसेल, तर इलेक्ट्रिक वाहने घ्या

0
17

>> मंत्री नीलेश काब्राल; कॉंग्रेसकडून वक्तव्याचा निषेध

नागरिकांना पेट्रोल, डिझेल या इंधनांचे वाढणारे दर परवडत नसतील, तर त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, असा सल्ला सार्वजनिक बांधकाम तथा पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी काल दिला. इंधनाच्या वाढणार्‍या दराबाबत तक्रार करण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करून आपला पैसा वाचवावा आणि पर्यावरणाचे रक्षण करावे. सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी अनुदान दिले जाते, असेही काब्राल यांनी सांगितले.

कॉंग्रेसकडून काब्राल यांच्या वक्तव्याचा निषेध
मंत्री नीलेश काब्राल यांनी इंधन दरवाढ परवडत नसेल तर इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करा, या केलेल्या वक्तव्याचा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी निषेध केला आहे. मंत्री काब्राल यांनी सत्तेच्या अहंकारातून हे वक्तव्य केले आहे, अशी टीका पाटकर यांनी केली.

असंवेदनशील व बेजबाबदार वक्तव्य करणार्‍या मंत्री नीलेश काब्राल यांना सत्तेचा माज चढलेला आहे. इंधन परवडत नसेल, इलेक्ट्रिक वाहने घ्या हे वक्तव्य म्हणजे पाव परवडत नसेल, तर केक खा, असे म्हणण्यासारखा प्रकार आहे, असा टोला कॉंग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी लगावला आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान देऊन सरकार जनतेवर उपकार करत नाहीत आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी दिले जाणारे अनुदान मंत्री महोदय स्वत:च्या खिशातूनही देत नाहीत, असेही ते म्हणाले.