इंधन उद्योगात आमूलाग्र बदलासाठी भारत सज्ज

0
328

– शशांक मो. गुळगुळे
आपल्या देशाला पेट्रोल व डिझेलच्या उपलब्धतेची समस्या भेडसावत आहे. मागणी व पुरवठा यात मोठी तफावत असल्यामुळे आपण जादा दराने तेल आयात करतो. मार्च २०१४ मध्ये भारताने २४.५ कोटी लिटर डिझेल एका दिवसात वापरल्याचे पेट्रोलियम प्लॅनिंग ऍनॅलिसिस सेलने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. याप्रमाणे एका महिन्यात अंदाजे ७६० कोटी लिटरवर आकडा पोहोचतो, तर वार्षिक वापराचा विचार केला तर ते प्रमाण ८ हजार कोटी लिटर इतके होते.
भारत हा क्रूड ऑईल आयात करणारा व वापरणारा जगातील चौथ्या क्रमांकाचा ग्राहक आहे. आयात तेलापैकी ४४ टक्के हिस्सा डिझेलचा असतो. भारताच्या लोकसंख्येवर नजर टाकली तर जगाच्या लोकसंख्येच्या अंदाजे १७.३१ टक्के लोक भारतात राहतात. पृथ्वीवरील सहा लोकांपैकी एकजण भारतीय असतो. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार २०२० पर्यंत भारतीय रस्त्यांवर ४५० दशलक्ष वाहने धावतील. याचा अर्थ भारतात डिझेलची मागणी वाढत राहणार आहे. त्यामुळे आपल्याला वाहतूक किंवा प्रवासाचा खर्च कमी करण्यासाठी तोडगा काढण्याची गरज आहे. म्हणजेच आपल्या आधारभूत संरचनेत बसणारा असा कायमस्वरूपी पर्याय आपल्याला हवा आहे जो सध्याच्या इंधनाशी सुसंगत असेल.
भारताला ऊर्जेत स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘माय इको एनर्जी’ने (एमइइ) अपारंपरिक डिझेल विकसित केले आहे. यांनी पहिले इनडिझेल इंधन केंद्र पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे नुकतेच १४ ऑगस्टपासून सुरू केले. हे इंधन केंद्र सुरू करण्यामागचा ‘एमइइ’चा उद्देश हा सक्षम व पर्यावरणाला अनुकूल असा इंधनाचा उपाय देणे हा आहे. जगभरातील सर्वच देशांची सरकारे विविध प्रकारांतून ऊर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. माय इको एनर्जीने घेतलेल्या पुढाकारामुळे भारत सरकारच्या प्रयत्नांना हातभार लागेल.
पेट्रोलियम उत्पादन असलेल्या डिझेलला पर्याय म्हणून ‘इनडिझेल’चे उत्पादन करण्यात आले आहे. हे जैवपदार्थांपासून उत्पादित केलेले असून विषविरहित आहे. वंगणाच्या आर्थिक गुणधर्मामुळे इंजिनचे ‘लाईफ’ वाढते. पेट्रोल किंवा डिझेलच्या इंजिनात कुठलाही बदल न करता हे वापरता येते. प्राणवायू अधिक प्रमाणात असल्यामुळे हे स्वच्छ प्रज्वलन होणारे इंधन आहे. याच्या उत्तम कम्बशनमुळे जादा ऊर्जा व जादा मायलेज मिळते. हे नियमित पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत स्वस्त पडते. हे कार, बस, ट्रक, बुलडोझर, जहाजे व ट्रॅक्टर्स अशा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वापरता येऊ शकते. याशिवाय इलेक्ट्रिसिटी जनरेटर्स, औद्योगिक बॉयलर व फर्नेसमध्येही इनडिझेल वापरता येऊ शकते. इनडिझेलच्या बिझनेस मॉडेलमुळे रिटेलर्सना नियमित फायदा मिळेल. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन आणि बाजारातील कल यांचा विचार करून माय इको एनर्जीने ग्राहकांपर्यंत सहजपणे पोहोचता यावे यासाठी विविध मॉडेल्स तयार केली आहेत. यात गुंतवणूकदारांना कमी गुंतवणुकीत संपूर्ण इन्स्टॉलेशन पॅकेज मिळेल व ते स्वतःच्या मालकीचा इनडिझेल व्यवसाय सुरू करू शकतील. फ्यूएल स्टेशन ते किऑस्क चालविणारा कुणीही इनडिझेल ‘आऊटलेट’ सुरू करू शकेल. सध्याचा ‘एसकेयू’ सुरू ठेवून व्यवसायमालक आहे त्या किरकोळ पायाभूत सुविधांद्वारे ‘इनडिझेल’चा व्यवसाय सुरू करू शकतो. कमीत कमी जागेत व किमान भांडवल गुंतवणुकीत ‘इनडिझेल’च्या विक्रीतून चांगला नफा मिळेल. भांडवली गुंतवणूक व उपलब्ध जागेचा विचार करून रिटेलर टाकीचा आकार निवडू शकतो व पम्पची उभारणी करू शकतो.
चीन, अमेरिका व रशियानंतर जगात भारत हा चौथा देश आहे जो मोठ्या प्रमाणावर तेल व पेट्रोलियम पदार्थ आयात करतो. तेल उत्पादनात डिझेलचा वापर सर्वाधिक असून २०१३ मध्ये पेट्रोलियम उत्पादन वापरापैकी ४४ टक्के वापर डिझेलचा होता. दरम्यान, भारताची तेलाची मागणी व पुरवठा यातील दरी वाढत आहे. दरवर्षी ४ अब्ज टन क्रूड ऑईलचा साठा कमी होत आहे. या दराने २०७२ पर्यंत तेलसाठे संपुष्टात येतील असे अहवालात म्हटले आहे. या परिस्थितीत ‘इनडिझेल’ हा एक उत्तम पर्याय असून तो वाजवी किमतीत उपलब्ध होत आहे.
जैवइंधनासाठी ‘माय इको एनर्जी’ सरकारकडून कुठल्याही प्रकारचे अनुदान घेत नाही. त्यामुळे करदात्यांची बचत होणार आहे. याशिवाय उत्पादन, किरकोळ विक्री व वितरण देशातच होणार असल्याने आयातीवरील खर्च कमी होईल. त्यामुळे व्यापारी तूटही कमी होईल. जैवइंधनाचे उत्पादन स्थानिक पातळीवर होणार असल्याने जैवइंधन उत्पादन कारखान्यांतून ग्रामीण भागातील शेकडो कर्मचारी व हजारो कामगारांना नव्याने रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जैवइंधन उत्पादनामुळे जैवइंधनाचे घटक असलेल्या पिकांना मागणी वाढणार आहे. त्याचबरोबर कृषी उद्योगाला चालना मिळून अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास मदत होईल. याशिवाय जैवइंधन विद्यमान पायाभूत सुविधांद्वारे वापरता येण्यासारखे असल्याने याची विक्री आणि खरेदी सहज होईल. तसेच किरकोळ विक्रीच्या मॉडेलमुळे लोकांना व्यवसायाची संधी मिळेल.
डब्ल्यूएचओच्या २०१२ मधील अहवालानुसार दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. तसेच याशिवाय भारतातील आणखीन १५ शहरे ही जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. ‘इनडिझेल’ हे ‘टेबल सॉल्ट’पेक्षा कमी ‘टॉक्झिक’ व साखरेपेक्षा अधिक बायोग्रेडेबल आहे. इनडिझेलच्या वापरामुळे वातावरणातील कार्बन मोनोऑक्साईड ज्वलन न झालेले हायड्रोकार्बन्स यांचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. अमेरिकेच्या ऊर्जा खात्याने केलेल्या एका अभ्यासानुसार जैवइंधनाचे उत्पादन व वापरामुळे पेट्रोलियम डिझेलच्या तुलनेत कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन ७८.५ टक्के कमी होते. त्यामुळे दीर्घकाळापासून पेट्रोलियम इंधनाच्या वापरातून वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड, हायड्रोकार्बन्स, सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईडची वाढलेली पातळी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय बायोडिझेलमध्ये सकारात्मक ऊर्जा समतोल आहे. ‘इनडिझेल’मध्ये वंगणाचे मोठे गुण असल्याने इंजिनाचे आयुष्य वाढते. इनडिझेलचे उत्पादन पेट्रोलियम डिझेलला पर्याय म्हणून वापरण्याच्या उद्देशाने केल्याने पेट्रोलियम तसेच डिझेलमध्ये ते कुठल्याही व कितीही प्रमाणात मिसळता येऊ शकते. जैवइंधन हे प्रत्येक देशाची आवश्यकता असून जगभरात याची अंमलबजावणी होत आहे. नजीकच्या भविष्यात महाराष्ट्रात बायोडिझेलचे रिटेलर व वितरकांचे नेटवर्क वाढविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात बायोडिझेल इंधन पंप उभारण्याबरोबर देशभरात नेटवर्क उभारण्यात येणार आहे. खेड्यात किमान एक आऊलेट उभारून ग्रामीण भारताला सशक्त करण्याचा विचार आहे. माय इको एनर्जी ही यु.के. कंपनी गो फ्यूएल्सची मदत संपूर्ण उत्पादन प्रक्रिया सक्षम करण्यासाठी व भारतीय बाजारपेठेतील वितरणाचे जाळे मजबूत करण्यासाठी घेणार आहे. याशिवाय भविष्यात युरोपीयन युनियन व पूर्वोत्तर युरोपीयन बाजारपेठ लक्ष्य करणार आहे.