– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)
वेगवान वाहनातून प्रवास करताना नाकाचा भाग झाकून घ्यावा.. जेणेकरून धुलीकण वेगाने नाकात जाणार नाहीत. तसेच घरातून बाहेर पडण्यापूर्वी रोज नाकाला आतून तेल लावावे.
पञ्चेन्द्रियाधिष्ठानेष्वेका घ्राणम् |
पाच इंद्रियांच्या अधिष्ठानापैकी एक इंद्रिय म्हणजे घ्राण म्हणजेच नाक. नाक हे घ्राणेंद्रियाचे स्थान आहे. याची उत्पत्ती पृथ्वी महाभूतापासून झाली आहे. याचा गुण गंध होय. श्वासोच्छ्वास करणे हे नाकाचे कार्य आहे. तसेच वास घेणे, गंधाची अनुभुती मनाला-आत्म्याला करून देणे हेसुद्धा काम नाकाचे आहे.
चाफेकळीसारखे नाक, धारदार नाक, चपटे नाक, नकटे नाक अशा वेगवेगळ्या उपाध्या देऊन कवींनी, कादंबरीकारांनी स्त्री सौंदर्याचे वर्णन केलेले आहे. माणसाचे व्यक्तिमत्त्व बर्याच अंशी त्याच्या नाकाच्या ठेवणीवर अवलंबून असते. पण चेहर्याचे सौंदर्य वाढवणे एवढेच नाकाचे काम नसते. म्हणूनच घ्राणेंद्रिय किंवा नाकाची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
नासा हि शिरसो द्वारम् |
नाक हे शिराचे द्वार असून त्यात टाकलेले औषध शृंगाटक स्रोतसात येऊन डोक्यात व डोळे, कान, नाक, घसा इत्यादी ठिकाणच्या शिरामुखात पसरून व्यापून टाकते व मानेच्या वरच्या भागातील सर्व दोषांना खेचून बाहेर काढते. नाकात औषध टाकणे या क्रियेला ‘नस्य’ असे म्हणतात.
नाक म्हणजे चेहर्याच्या मध्यभागावरचा चार अंगुळे लांबीचा त्रिकोणाचा उंचवटा. पिरॅमिडच्या आकाराच्या नाकाच्या पोकळीचे मधल्या उभ्या पडद्यामुळे दोन समान भाग होतात आणि बाहेरील भागाला आतल्या बाजूने तीन मांसल उंचवटे असतात. या मांसल भागांमध्ये अतिसूक्ष्म आणि प्रचंड प्रमाणात रक्तवाहिन्या असतात आणि त्यामुळे श्वसनावाटे आत घेतली जाणारी हवा दमट आणि उबदार बनवली जाते.
गंधग्रहण – नाकाच्या अंतरत्वचेचा वरचा एक तृतियांश भाग वास ग्रहण करण्याचे काम करतो. या भागात वास ग्रहण करण्यार्या विशेष पेशी असतात. तेथून नसेद्वारे गंधज्ञान मेंदूकडे पाठवले जाते.
श्वसनमार्ग – नाकाच्या पोकळीच्या प्रवेशाजवळच आतील बाजूने केसांची रांग असते. नाकातून आत घेतली जाणारी हवा येथे गाळली जाते आणि मग नाकाच्या मांसल भागातील रक्तवाहिन्यांमुळे आणि श्लेष्मल त्वचेवरील द्रवामुळे हवेचे दमट किंवा उष्ण हवेमध्ये रुपांतर होते.
नाकाचे विकार किंवा घ्राणेंद्रियांस त्रास होण्याची कारणे –
* वार्याचे अधिक सेवन, नाकात धूळ अधिक गेल्याने, अत्यंत अधिक भाषण केल्याने, अधिक प्रमाणात झोपल्याने, तसेच अतिजागरणाने, अतिशय उंच वा बारीक उशीवर झोपल्याने, नाकाने पाणी प्यायल्याने, अत्यधिक प्रमाणात पाणी प्यायल्याने, उलटी तसेच रडण्याचा वेग आला असता जबरदस्ती आवरून धरण्याने, कूपित झालेले वातादि दोष नासारोग उत्पन्न करतात.
घ्राणेंद्रियांची काळजी –
* गंधज्ञानाचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी नाकाचा आतील भाग स्निग्ध असावा लागतो. त्यासाठी नाकाला आतून नियमितपणे तेलाने अभ्यंग करावे. काही वेळा जुनाट सर्दीने कोणताच वास येत नाही. अशावेळी आयुर्वेदिय औषधांनी ‘नस्य’ करावे.
* वारंवार सर्दी असेल तर चेहर्यावर वाफ घ्यावी. नस्य करावे. अति तीक्ष्ण वास, दुर्गंधीयुक्त वास, अति उग्र दर्पाचे अत्तरांचे वास घेणे टाळावे. योग्य वैद्यक उपचार करावेत.
* नाकाने घेतलेला गंध मनावर तात्काळ परिणाम करतो. त्यामुळे मनाचे आरोग्य राखण्यासाठी सौम्य सुगंधाचा उपयोग करावा. सौम्य सुगंधाचे अत्तर रोज अंगावर शिंपडावे. घरात तसेच कामाच्या ठिकाणी सौम्य अगरबत्तीचा, धूपाचा गंध दरवळत ठेवावा, जेणे करून घर, वातावरण प्रसन्न व प्रफुल्लित राहते व मनही आनंदित राहते.
* थंड वारा, प्रदूषण, वार्यात जाताना नाकावर पातळ रूमाल ठेवून नाक झाकावे. विषारी वायूच्या संपर्कात आल्यास नाकावर ओला रूमाल ठेवून त्याद्वारेच श्वसन करावे, धूर, वायुगळती असलेल्या ठिकाणापासून बाहेर पडताना जमिनीवर सरपटत पुढे सरकावे, कारण वायुची गती नेहमी वरील दिशेने असते. जमिनीलगत थोडी शुद्ध हवा श्वसनासाठी मिळू शकते.
* वेगवान वाहनातून प्रवास करताना नाकाचा भाग झाकून घ्यावा.. जेणेकरून धुलीकण वेगाने नाकात जाणार नाहीत. तसेच घरातून बाहेर पडण्यापूर्वी रोज नाकाला आतून तेल लावावे.
तपकिरीसारखे पदार्थ हुंगून वारंवार मुद्दाम शिंका काढू नयेत. सर्दी झाल्यास रुमालाने नाक हळुवार पुसावे. चेहर्यावर वाफ घ्यावी. प्रतिमर्श नस्य करावे.
* काही वेळा लहान मुले नाकात शेंगदाणा, चुरमुरा, बटण अशा काही वस्तू घालतात. अशा वेळी घरी उपाय न करता लवकरात लवकर डॉक्टरांकडे न्यावे. श्वासावरोध होऊ नये म्हणून त्यास तोंडाने श्वास घेण्यास सांगावा. नाकात पाणी वगैरे घालू नये.
* गर्दीच्या ठिकाणी संसर्गजन्य रोगांपासून बचाव होण्यासाठी फेसमास्क वापरावा. दूषित बोटे नाकात घालू नये.
* बाहेरून आल्यावर घरी हात-पाय धुतेवेळी नाकपुड्याही स्वच्छ कराव्यात व नाकाला आतून तेल लावावे.
घ्राणेंद्रियांची म्हणजेच नाकाची व्यवस्थित काळजी न घेतल्यास पीनस, पूतिनस्य, नासापाक, रक्तपित्त, पूयरक्त, क्षवथु, भ्रंशथु, दीप्त, नासाप्रतिनाह, नासापरिस्राव, नासापरिशोथ यांसारखे व्याधी होतात.
पीनस – नाक बंद होते, श्वास उष्ण येतो, नाकातून कधी शेंबूड येतो तर कधी नाक कोरडेही पडते. नाकाला पदार्थांचा वास समजत नाही.
पूतिनस्य – गळा व टाळू यांच्या ठिकाणी कोंडलेला वायु नाक व तोंडातून दुर्गंध घेऊन बाहेर येतो.
नासापाक – नाकाच्या आतील बाजूस बारीक सारीक व्रण उत्पन्न होतात.
रक्तपित्त – नाकातून रक्त येणे. नाकातून रक्त यायला लागल्यास आडवे झोपून डोक्यावर थंड पाणी शिंपडावे. अर्धा कापलेला कांदा डोक्यावर ठेवावा.
पूयरक्त – नाकावाटे रक्तमिश्रित पू वाहतो.
क्षवधु – सारख्या शिंका येणे.
भ्रंशथु – मस्तकात साठलेला कफदोष पित्तप्रकोपाने तापून नाकावाटे घट्ट स्वरूपात बाहेर येतो.
दीप्त – नाक आतून पेटल्यासारखे वाटते.
नासाप्रतिनाह – नाक बंद राहते.
नासापरिस्राव – नाकातून पाण्यासारखा वर्णरहित व स्वच्छ असा स्राव होतो.
नासापरिशोष – नाकातील कफ, वायु व पित्ताच्या प्रकोपाने अतिशय शुष्क होतो व श्वसनाला फार कष्ट होतात.
याप्रमाणे घ्राणेंद्रियांच्या स्वास्थ्यायाठी व नासागत रोग टाळण्यासाठी आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेले तेल, उदा. अणु तेलाचा वावर रोज नाकात घालण्यासाठी नस्य म्हणून करावा किंवा घरी बनवलेल्या साजूक तूपाचे २-३ थेंब रोज नाकात टाकावे. याने नुसतेच नाकाचेच नव्हे तर मेंदू व इतरही ज्ञानेंद्रियांचे स्वास्थ्य टिकावयास मदत होते.
पथ्य – स्नेहन, स्वेदन, डोक्यावर तेलाचा अभ्यंग, जुने तांदूळ, कुळीथ, मूग, वांगे, पडवळ, शेवगा, ताजा मुळा, लसूण, गरम पाणी, तिखट, आंबट, खारट, स्निग्ध व पचण्यास हलके जेवण. त्रिकटू-सुंठ, पिंपळीचे सेवन.