>> चेंगराचेंगरीत १७४ जणांचा मृत्यू,
>> १८० गंभीर, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
इंडोनेशियाच्या मलंग रीजेंसीच्या कंजुरुहान स्टेडियमवर एका सामन्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १७४ जणांचा मृत्यू झाला. तर १८० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. याशिवाय १६० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इंडोनेशियातील एका स्टेडियममध्ये दोन संघांमध्ये सामना सुरू होता. एका संघाने सामना गमावल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला. पूर्व जावा येथील सामन्यानंतर संतप्त चाहत्यांनी फुटबॉल मैदानावर हल्ला केल्यामुळे सामना पाहायला आलेल्या अनेक प्रेक्षकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. स्टेडियममध्ये ३४ लोकांचा मृत्यू झाला असून इतर जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय या संघादरम्यान हा सामना झाला. यात सुराबाय संघाने अरेमा संघावर मात करत फुटबॉल सामना ३-२ अशा फरकाने जिंकला. त्यामुळे अरेमाचे चाहते नाराज झाले. या संघाचे हजारो चाहते थेट स्टेडिअममधून मैदानात घुसले आणि त्यांनी तिथे हिंसाचार सुरू केला.
यावेळी तात्काळ स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले. तसेच, इंडोनेशियाच्या राष्ट्रीय सशस्त्र दलाचे सदस्य मैदानात दाखल झाले आणि प्रतिस्पर्धी सुराबाय संघाच्या खेळाडूंना संरक्षण दिले.
या दरम्यान नाराज चाहत्यांनी खेळाडूंवर हल्ला केला. यावेळी मोठ्याप्रमाणात हिंचासाचर सुरू झाला. यावेळी पोलिसांनी हा हिंसाचार रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून संतप्त जमावावर लाठीमारही केला. तसेच, गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे मैदानातील चाहत्यांमध्ये धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या. या दुर्घटनेत १७४ जणांच्या मृत्यू झाला. तर, अनेक गंभीररित्या जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर इंडोनेशिया बीआरआई लीगचे सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत.