>> भाजप प्रवक्ते तथा माजी आमदार दयानंद सोपटे यांचा पत्रकार परिषदेत दावा
इंडिया आघाडी येत्या 2-3 महिन्यात संपुष्टात येईल, असा दावा भाजप प्रवक्ते तथा माजी आमदार दयानंद सोपटे यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला.
लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोवा विधानसभेच्या 2027 च्या निवडणुकीसाठी ‘30 पार’ची घोषणा केली आहे. काल भाजप मुख्यालयात भाजप नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीचा हा दावा खोडून काढला.
आगामी गोवा विधानसभेच्या 2027 च्या निवडणुकीत भाजप उत्तर गोव्यातील सर्व 20 जागा जिंकेल. लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर गोव्यातील 16 मतदारसंघात आघाडी मिळालेली आहे. इंडिया आघाडीला केवळ 4 मतदारसंघात आघाडी मिळाली आहे, असे सोपटे म्हणाले.
लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने 27 मतदारसंघात मतांची आघाडी मिळविली. काँग्रेस पक्ष दक्षिण गोव्यात कमी मतांच्या फरकाने मिळालेल्या विजयाचा जल्लोष साजरा करीत आहे, असे आमदार संकल्प आमोणकर म्हणाले. इंडिया आघाडीचा सर्वांत मोठा फटका ‘आप’ला बसला आहे. त्यांना दिल्लीत एकही जागा जिंकता आली नाही, असे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर म्हणाले.
2027 मध्ये पुन्हा भाजपचेच सरकार : मुख्यमंत्री
गोवा विधानसभेच्या 2027 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केला. केंद्रामध्ये एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येत आहे. त्यामुळे आगामी काळात गोव्यातील विकासकामांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.