इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ आज मणिपूरमध्ये

0
52

मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विरोधक केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. विरोधकांच्या या आघाडीचे एक शिष्टमंडळ दोन दिवसांसाठी मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहे. या शिष्टमंडळात 16 पक्षांच्या एकूण 20 नेत्यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ 29 आणि 30 जुलै रोजी विविध भागांना भेट देऊन तिथल्या सत्य परिस्थितीचा आढावा घेईल. दरम्यान, हे शिष्टमंडळ मणिपूरच्या राज्यपालांचीही भेट घेणार आहे.

या शिष्टमंडळात काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी आणि गौरव गोगोई, जेडीयूचे राजीव रंजन सिंग, अनिल प्रसाद हेगडे, टीएमसीच्या सुष्मिता देव, डीएमकेच्या कनिमोझी, करुणानिधी, सीपीआयचे संतोष कुमार, सीपीआयएमचे ए. ए. रहीम, आरजेडीचे मनोज झा, सपाचे जावेद अली खान, माही अली खान यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादीचे पी. पी. मोहम्मद फैजल, आययूएमएलचे ईटी मोहम्मद बसीर, आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन, आपचे सुशील गुप्ता, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्यासह डी. रविकुमार, थिरूथॉल थिरुमावलावन, जयंत सिंह, फुलो देवी नेताम या अन्य काही नेत्यांचा समावेश आहे.

सीबीआयकडून 10 जणांना अटक
मणिपूर हिंसाचार प्रकरणी सीबीआयकडून तपासाला गती देण्यात आली आहे. तसेच आरोपींच्या अटकेची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत सहा तक्रारी नोंदवल्या आहेत, तर दहा जणांना सीबीआयने अटक केली आहे.

हिंसाचार कायम
मणिपूरच्या चुराचांदपूरमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा कुकी आणि मैतेई समाजामध्ये हिंसाचार झाला. त्यात चार जण जखमी झाले, तर एकाचा एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही लोकांनी सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला.