इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू

0
9

राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात एकवटलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील दिग्गज नेते मुंबईत दाखल झाले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांचेही मुंबईत आगमन झाले. तिसऱ्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय शुक्रवार दि. 1 सप्टेंबरला होणार असून, या बैठकीत 28 राजकीय पक्षांचे एकूण 63 प्रतिनिधी हजर राहणार आहेत. त्यामध्ये 11 मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.

देशातील 28 राजकीय पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. बिहारमध्ये पहिली, तर कर्नाटकात दुसरी बैठक पार पडल्यानंतर मुंबईत तिसरी बैठक पार पडत आहे. या बैठकीचे आयोजन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे. जिथे इंडिया आघाडीतील घटकपक्ष सत्तेत नाहीत, अशा ठिकाणी तिसरी बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काल इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी अनेक नेत्यांचे मुंबईत आगमन झाले. त्यानंतर सायंकाळी 6.20 ते 8.30 या वेळेत अनौपचारिक बैठक पार पडली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य नेते हजर होते. त्यानंतर रात्री 8.30 वाजता इंडिया आघाडीची डिनर डिप्लोमसी झाली.

1 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 च्या दरम्यान इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडेल. दुपारच्या भोजनानंतर सायंकाळी 3.30 वाजता पत्रकार परिषद होऊन बैठकीतील निर्णयांची माहिती दिली जाणार आहे.
‘इंडिया’च्या लोगोचे अनावरण होणार
मुंबईतील बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण केले जाणार आहे. हा लोगो देशातील 140 कोटी जनतेच्या एकतेचे प्रतीक असेल, असे सांगण्यात आले आहे.

महत्त्वाचे निर्णय होणार
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची घोषणा आणि संयोजक पदाची घोषणा मुंबईतील बैठकीत होईल, असे कर्नाटकमधील बैठकीत सांगण्यात आले होते. आता मुंबईतील बैठकीत समन्वय समितीत कुणाची वर्णी लागणार, संयोजकपद कुणाकडे जाणार हे पाहावे लागणार आहे. लोकसभेसाठी जागा वाटप यावर हे पक्ष कसा मार्ग काढतात हे देखील या बैठकीतून समोर येईल.