‘इंडिया’चा एकजुटीने लढण्याचा निर्धार

0
4

>> मुंबईतील तिसरी बैठक आटोपली; निवडणुकीसाठी केंद्रीय समन्वय समितीची घोषणा; समितीत 14 जणांचा समावेश

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक काल मुंबईत पार पडली. या बैठकीत इंडिया आघाडीकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढतील आणि शक्य तितक्या विधानसभा निवडणुका देखील एकत्र लढतील. तसेच निवडणुकांसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया ताबडतोब सुरू केली जाईल. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकत्रितपणे सार्वजनिक सभा घेतील. याशिवाय इंडियामधील पक्ष विविध भाषांमधून ‘जुडेगा भारत, जीतेगा इंडिया’ या इंडियाच्या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करतील, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

इंडिया आघाडीची गुरुवारपासून मुंबईत तिसरी बैठक सुरू झाली होती. काल मुख्य बैठक झाली, त्यात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांच्यासह अन्य 28 पक्षांचे एकूण 63 प्रतिनिधी बैठकीला हजर होते.

कालच्या बैठकीत इंडिया आघाडीने आगामी निवडणुकांसाठीची रणनीती तयार केली. या बैठकीसाठी जमलेल्या 28 पक्षांच्या नेत्यांनी बैठक पार पडल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत इंडिया आघाडीने निवडणुकीसाठी 14 सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा केली. ही समन्वय देशभरात फिरून पुढील अजेंडा ठरवणार आहे. याशिवाय प्रचार समिती, सोशल मीडिया कार्यकारी समिती, माध्यम कार्यकारी समिती आणि संशोधन कार्यकारी समिती देखील निवडण्यात आली. या विविध समित्यांमध्ये जवळपास सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे.

‘इंडिया’च्या लोगोचे अनावरण नाही
इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे. काही पक्ष नव्याने आघाडीत सामील झालेले आहेत, त्यांनाही हा लोगो तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जाणार आहे. समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीत चर्चा होईल. त्यानंतर लोगो निश्चित केला जाईल. लोगोसाठी एकूण पाच ते सात पर्याय आहेत. हे सर्व लोगो नव्याने आलेले पक्ष आणि समितीसमोर ठेवले जातील, त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय होईल.

केंद्रीय समन्वय समितीत कोणाचा समावेश?
निवडणुकीसाठीच्या केंद्रीय समन्वय समितीत के. सी. वेणुगोपाल (काँग्रेसचे सरचिटणीस), शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष), एम. के. स्टॅलिन (तामिळनाडूचे मुख्यमंत्री), संजय राऊत (शिवसेना ठाकरे गट), तेजस्वी यादव (आरजेडी नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री), अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस), राघव चढ्ढा (आपचे खासदार), जावेद खान (समाजवादी पक्ष), लालन सिंग (जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष), हेमंत सोरेन (झारखंडचे मुख्यमंत्री), डी. राजा (सीपीआयचे नेते), ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्सचे नेते) आणि मेहबुबा मुफ्ती (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख) यांचा समावेश आहे.

एकत्र लढलो, तर भाजपचा पराभव निश्चित
आत्ता या मंचावर जे नेते आणि वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, हे सर्वजण देशातल्या 60 टक्के लोकांचं प्रतिनिधीत्व करतात. आम्ही 28 पक्ष एकत्र आलो आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्र लढलो, तर नक्कीच भारतीय जनता पक्षाला पराभूत करू शकतो, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.