‘इंडिया’आघाडीत फूट

0
32

भारतीय जनता पक्षाचा अश्वमेध रोखण्यासाठी गाजावाजा करून घडवलेली ‘इंडिया’ आघाडी लोकसभा निवडणूक घोषित होण्याआधीच धराशायी होणार की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. ह्या आघाडीतील प्रमुख नेत्या ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या दोघांनीही अनुक्रमे बंगाल आणि पंजाबमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत न जाण्याचा आपला इरादा जाहीर करून टाकला आहे. म्हणजेच काँग्रेस आणि हे पक्ष आपापल्या राज्यांत स्वतंत्रपणे लढणार आहेत आणि अर्थातच भाजपचा विजयाचा मार्ग सुकर करणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या समर्थनात पुढे आल्या होत्या खऱ्या, परंतु आपले घोडे दामटता येत नसल्याचे दिसताच त्यांनी सावध पवित्रा अवलंबण्यास सुरुवात केली होती. अरविंद केजरीवाल यांनी तर इंडिया आघाडीच्या अगदी पहिल्याच बैठकीपासून स्वतःचा सवतासुभा आखायला सुरूवात केली होती. ‘इंडिया’ आघाडी घडवायची असेल तर आधी काँग्रेस पक्षाशी जुळवून घेणे जरूरी होते. मागील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ वगैरे जिंकून घेतले तेव्हा त्या पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, काँग्रेसला आपले हे यश पचवता आले नाही आणि एकेका राज्यातून त्यांची सत्ता ढासळत राहिली. ज्योतिरादित्य शिंद्यांच्या बंडानंतर त्यांनी मध्य प्रदेश गमावले, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान आणि छत्तीसगढवर पाणी सोडावे लागले. दक्षिणेतील तेलंगणा हाती आले असले, तरी उत्तर भारतातून जवळजवळ सफाया झाल्याने काँग्रेसची पतही खालावली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांकडून काँग्रेसला बेटकुळ्या दाखवायला आणि जागावाटपामध्ये जोरदार सौदेबाजी सुरू झाली. बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यापैकी 22 जागा तृणमूलने जिंकल्या, 18 भाजपकडे गेल्या, तर काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. तृणमूलच्या ह्या बालेकिल्ल्यात त्या पक्षाला मिळालेल्या 43.7 टक्के मतांच्या तुलनेत नवख्या भाजपने 40.6 टक्के मते मिळवून तृणमूलपुढे मोठे आव्हान उभे केले होते. काँग्रेसला दोनच जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे येत्या निवडणुकीतही तृणमूल काँग्रेससाठी केवळ दोनच जागा सोडायला तयार होता. काँग्रेसने सहा जागांचा आग्रह धरला होता. त्यावरून दोन्ही पक्षांचे फाटलेले दिसते. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे भगवंत मान सरकार सत्तेवर आहे. तेथे आम आदमी पक्षाने काँग्रेसशी हातमिळवणी न करता स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवून राज्यातील सर्वच्या सर्व 13 जागा जिंकणार असल्याची घोषणा करून टाकली आहे. इंडिया आघाडीतील दोन प्रमुख पक्षांनीच काँग्रेसकडून अशी फारकत घेतलेली असल्याने इतर पक्षांकडूनही काँग्रेसच्या मागणीला किती किंमत दिली जाईल ही शंकाच आहे. काँग्रेससाठी हा मोठा हादरा आहे, कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत को पक्ष अस्तित्वाची लढाई लढणार आहे. राहुल गांधी सध्या मणिपूरहून भारत जोडो न्याय यात्रा घेऊन मुंबईकडे निघाले आहेत. आज ही यात्रा बंगालमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र, ही यात्रा बंगालमधून जाणार आहे ह्याची आपल्याला काँग्रेसने कल्पना दिलीच नव्हती, असे ममतांचे म्हणणे आहे. तेवढे म्हणूनच त्या थांबलेल्या नाहीत, तर इंडिया आघाडीवर डाव्यांचा प्रभाव आहे आणि गेली 34 वर्षे ज्या डाव्या पक्षांशी आपण लढत आले, त्यांच्यासोबत आपण जाऊ शकत नाही असेही ममतांनी ठणकावले आहे. ‘इंडिया’ आघाडीला आणखी एक दणका बसण्याची सध्या जोरदार चर्चा आहे, तो संयुक्त जनता दलाचे नेते नीतिशकुमार यांच्याकडून. नीतिशकुमार ऐन निवडणुकीच्या आधी पुन्हा टोपी फिरवून भाजपच्या सोबतीला येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. त्याच दिशेने त्यांची पावले पडत आहेत. अयोध्येतील राममंदिराने उत्तर भारतात निर्माण केलेले राममय वातावरण, दिवंगत समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’प्रदान करून मागास आणि अतिमागासवर्गीयांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने दिलेला मास्टरस्ट्रोक ह्यामुळे नीतिश यांची हुकमी मतपेढी भाजपला साथ देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात अस्वस्थता आहे. ममतांनी मांडलेली वेगळी चूल, केजरीवालांचा सवतासुभा आणि आता नीतिशची नवी चाल ह्या सगळ्या परिस्थितीत इंडिया आघाडीचे भवितव्य काय आणि भाजपसारख्या बलाढ्य पक्षाशी ती लढत कशी देणार हाच प्रश्न आज निर्माण झालेला दिसतो. हा गतिरोधक दूर सारू असे काँग्रेस नेते म्हणत असले, तरी ते तेवढे सोपे नक्कीच नाही.