दक्षिण कोरियातील इंचियॉन येथे झालेल्या सतराव्या आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये पुरूष व महिला कबड्डी संघांनी अखेर सुवर्णपदके पटकावून भारताची पदक तालिका ५७ वर नेली. चीन, यजमान दक्षिण कोरिया, जपान आदी देशांच्या तुलनेत भारताची या क्रीडा स्पर्धेतील कामगिरी मुळीच समाधानकारक नाही. यापूर्वी चीनमधील गांगझू येथे झालेल्या स्पर्धेमध्ये भारताला ६५ पदके मिळाली होती, त्या तुलनेतही यंदाची पदक संख्या बरीच कमी झाली आहे. जय – पराजयाचा विचार करायचा झाला तर हॉकीमध्ये तब्बल सोळा वर्षांनंतर भारताला मिळालेले विजेतेपद, कबड्डीमध्ये पुरूष व महिला या दोन्ही संघांना मिळालेले झळाळते सुवर्णपदक आणि मुष्टियुद्धामध्ये एल सरितादेवीने आपले ब्रॉंझ पदक स्वीकारण्यास नकार देऊन निर्माण केलेला वाद या दोन गोष्टींमुळे इंचियॉनच्या यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धा भारतीयांच्या लक्षात राहतील. पुरूष हॉकीमध्ये अंतिम सामन्यात पाकिसस्तान संघावर टायब्रेकरमध्ये ४ – २ गोलने विजय मिळवीत कप्तान सरदारसिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाने आशियाई सुवर्णपदक खेचून आणून आणखी दोन वर्षांनी होणार असलेल्या रियो ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश प्राप्त केलेला आहे. पाकिस्तानवरील विजय हा भारतीयांसाठी नेहमीच भावनिकदृष्ट्या मोलाचा वाटत आला आहे. त्यामुळे त्या यशाची झळाळी अधिक वाढली आहे. कबड्डी या भारतीय क्रीडाप्रकाराचा समावेश आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये करण्यात आला तेव्हापासून भारतीय संघाने आपले वर्चस्व त्या क्रीडाप्रकारावर कायम राखले आहे. यंदाही पुरूष व महिला या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्णपदक खेचून आणले. मात्र, अंतिम सामन्यांचे विश्लेषण करायचे झाल्यास पुरूष संघाला हा विजय प्राप्त करण्यासाठी इराणशी बरीच झुंज द्यावी लागली असे दिसते. मध्यंंतरापर्यंत भारतीय खेळाडू १३ – २१ असे पिछाडीवर होते. शेवटच्या सात मिनिटांमध्ये भारताला आघाडी प्राप्त करता आली आणि आपले विजेतेपद कायम राखता आले. महिलांचा संघ मात्र मध्यंतरापर्यंतही आपली १५ – ११ ची आघाडी कायम ठेवून होता. इराणचे दोन्ही कबड्डी संघ भारताला झुंजवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत हे यंदाच्या आशियाई क्रीडास्पर्धेत दिसून आले आहे, त्यामुळे यापुढील क्रीडास्पर्धांमध्ये आपले विजेतेपद हिसकावून घेतले जाऊ नये असे जर भारतीय कबड्डी संघांना वाटत असेल, तर त्यासाठी अधिक कठोर मेहनत घेणे आवश्यक असेल. मुष्टियुद्धामध्ये भारताच्या लैशराम सरितादेवीच्या बाबतीत जो काही प्रकार घडला तो सगळाच दुर्दैवी होता. उपांत्यफेरीत तिच्यावर अन्याय झाला, यात संशयच नाही, परंतु अंतिम सामन्यानंतर जेव्हा तिच्या वाट्याला ब्रॉंझ पदक आले, तेव्हाचे तिचे वर्तन समर्थनीय ठरत नाही. भावनिक कल्लोळातून हा प्रकार जरी घडला असला, तरीही एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेमध्ये अशा प्रकारचा अशोभनीय प्रकार एवढ्या ज्येष्ठ व अनुभवी खेळाडूच्या हातून घडणे हे योग्य म्हणता येणार नाही. उपांत्य फेरीतील पराभवासंदर्भातील भारताची तक्रार मुष्टियुद्ध संघटनेने स्वीकारली नाही, हे जरी खरे असले, तरी पदक वितरण सोहळ्यामध्ये सरितादेवीने केलेला प्रकार योग्य ठरत नाही. तिने आपले पदक स्वीकारण्यास नकार तर दिलाच, पण उपांत्य सामन्यात आपल्याला जिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला, त्या कोरियाच्या पार्क जिनाच्या गळ्यात आपले ते ब्रॉंझपदक नेऊन घातले. काय घडले हे कळायला पार्क जिनाला काही क्षण जावे लागले. पण काय घडले हे लक्षात येताच तिने सरितादेवीच्या जवळ जाऊन तिचे पदक तिच्या हवाली करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही सरितादेवी ते पदक तेथेच टाकून गेली. सरितादेवी ही अर्जुन पुरस्कार प्राप्त केलेली भारतीय मुष्टियोद्धी आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायामुळे आपले सुवर्णपदक हुकले याचे तिला वाईट वाटणे स्वाभाविक आहे. कोणालाही त्याचे अतोनात दुःख झालेच असते, परंतु पदक वितरणाच्या वेळी जो प्रकार तिने केला, तो झाला नसता, तर तिची बाजू अधिक बळकट बनली असती. तिने बिनशर्त माफी मागितल्याने हे प्रकरण आता मिटले आहे. एकूण भारताच्या जय – पराजयाच्या या कडू गोड आठवणी मागे ठेवून या आशियाई क्रीडा स्पर्धेवर आता पडदा पडला आहे.