जेम्स व्हिन्स व मार्क स्टोनमन यांनी लगावलेल्या अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने दुसर्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवरील एकूण आघाडी २३१ धावांची केली आहे. कसोटीच्या तिसर्या दिवसअखेर त्यांचे ७ गडी शिल्लक असून इंग्लंडने दुसर्या डावात ३ बाद २०२ अशी भक्कम स्थिती गाठली आहे. व्हिन्स ७६ धावा करून बाद झाला तर स्टोनमनने वैयक्तिक सर्वाधिक ६० धावांची नोंद केली. कर्णधार ज्यो रुट ३० व डेव्हिड मलान १९ धावांवर नाबाद होते.
दुसर्या दिवसअखेरच्या ६ बाद १९२ धावांवरून काल पुढे खेळताना न्यूझीलंडचा पहिला डाव २७८ धावांत संपला. यामुळे इंग्लंडला पहिल्या डावाच्या आधारे २९ धावांची आघाडी मिळाली. दुसर्या डावात इंग्लंडची सुरुवात खराब झाली. माजी कर्णधार व सलामीवीर ऍलिस्टर कूक केवळ १४ धावा करून माघारी परतला. सध्या प्रगतीपधावर असलेल्या कसोटी मालिकेतील त्याची ही सर्वाधिक धावसंख्या होती. मालिकेतील चार डावांत त्याला केवळ २३ धावा करता आल्या आहेत. प्रत्येकवेळी ट्रेंट बोल्ट याने त्याला बाद केले आहे. कूकच्या पतनानंतर व्हिन्स व स्टोनमन यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सतावण्याचे काम केले. वैयक्तिक ३५ धावांवर असताना पंचांनी स्टोनमनला झेलबाद दिले होते. परंतु, रिव्ह्यूनंतर त्याच्याबाजूने निर्णय झाला. स्टोनमनने तीन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदविलेली आपलै वैयक्तिक सर्वोत्तम ५६ ही धावसंख्या मागे टाकली. वैयक्तिक ४८ धावांवर असताना स्लिपमध्ये रॉस टेलरने त्याला जीवदान दिले. सातत्याने स्लिपच्या दिशेने खेळण्याचा मोह अखेर स्टोनमनला नडला. साऊथीच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक वॉटलिंगने उजवीकडे झेपावत त्याचा झेल घेतला. व्हिन्स स्लिपमध्ये झेलबाद झाला. केवळ एक स्लिप असताना चेंडूला योग्य दिशा देण्यात अपयश आल्यामुळे त्याला रॉस टेलरकडे झेल देऊन परतावे लागलेे. अंधुक प्रकाशामुळे तीन षटके शिल्लक असताना तिसर्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला. नवीन चेंडू उपलब्ध होण्यासाठी न्यूझीलंडला अजून १४ षटके वाट पहावी लागणार असून जुन्या चेंडूवर अधिकाधिक धावा जमविण्याचा इंग्लंडच्या खेळाडूंचा प्रयत्न असेल.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद ३०७, न्यूझीलंड पहिला डाव ः (६ बाद १९६ वरून) ः वॉटलिंग त्रि. गो. साऊथी ८५, टिम साऊथी त्रि. गो. अँडरसन ५०, ईश सोधी झे. बॅअरस्टोव गो. ब्रॉड १, नील वॅगनर नाबाद २४, ट्रेंट बोल्ट झे. मलान गो. ब्रॉड १६, अवांतर १, एकूण ९३.३ षटकांत सर्वबाद २७८
गोलंदाजी ः जेम्स अँडरसन २४-५-७६-४, स्टुअर्ट ब्रॉड २२.३-५-५४-६, मार्क वूड २१-३-६९-०, जॅक लिच १९-३-५२-०, ज्यो रुट १-०-९-०, बेन स्टोक्स ६-२-१७-०
इंग्लंड दुसरा डाव ः ऍलिस्टर कूक झे. वॉटलिंग गो. बोल्ट १४, मार्क स्टोनमन झे. वॉटलिंग गो. साऊथी ६०, जेम्स व्हिन्स झे. टेलर गो. बोल्ट ७६, ज्यो रुट नाबाद ३०, डेव्हिड मलान नाबाद १९, अवांतर ३, एकूण ६६ षटकांत ३ बाद २०२
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट १५-३-३८-२, टिम साऊथी १३-३-४२-१, कॉलिन डी ग्रँडहोम १२-०-३७-०, नील वॅगनर १५-२-३८-०, ईश सोधी ११-०-४६-०