मोहम्मद अब्बास आणि हसन अली यांच्या भेदक गोेलंदाजीमुळे इंग्लंडचा पहिला डाव १८४ धावांवर संपुष्टात आणत प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ गडी गमावत ५० धावा करीत पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मजबूत पकड मिळविली आहे.
मोहम्मद अब्बास आणि हसन अली यांच्या भेदम मार्यामुळे प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ १८४ धावांवर गारद झाला. सलामीवीर कर्णधार ऍलिस्टर कूक (१४ चौकारांनिशी ७० धावा), जॉनी बेअरस्टोव्ह (२७), बेन स्टोक (३८) आणि जोस बटलर (१४) वगळता इतर सर्व फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजीपुढे निष्प्रभ ठरले. त्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मार्क स्टोनमेन व कर्णधार जो रुट प्रत्येकी ४ तर डीजे मलान ६ धावा जोडून तंबूत परतले. डॉम्निक बेस (५), मार्क वूड (७), स्टुअर्ट ब्रॉड (०) या तळाच्या फलंदाजांना अब्बास व अली यांनी झटपट परतीचा रस्ता दाखविला. पाकतर्फे अब्बास आणि हसन यांनी प्रत्येकी ४ तर मोहम्मद अमिर व फहीम अश्रफ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात खेळताना पाकिस्तानने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ गड्याच्या मोबदल्यात ५१ धावा बनविल्या. स्टुअर्ट ब्रॉडने इमाम-उल-हक (४) याला तंबूत पाठवित इंग्लंडला प्रारंभीच पहिले यश मिळवून दिले होते. परंतु त्यानंतर अझर अली आणि हॅरिस सोहेल यांनी आणखी गडी बाद होऊ न देता दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३९ धावांची अविभक्त भागीदारी केली. अझर अली १८ तर हॅरिस सोहेल २१ धावांवर नाबाद खेळत होते.