ज्यो रुट (८३) व डेव्हिड मलान यांनी चौथ्या गड्यासाठी १३५ धावांची भागीदारी करूनही इंग्लंडला पाचव्या ऍशेस कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवता आले नाही. दिवसाचा खेळ संपण्यास काही मिनिटे असताना मिचेल स्टार्क व हेझलवूडने प्रत्येकी एक गडी बाद करत इंग्लंडची ३ बाद २२८ वरून ५ बाद २३३ अशी स्थिती करत कांगारूंना वर्चस्व प्रस्थापित करून दिले.
इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्क स्टोनमन याने वेगाने धावा जमवताना कांगारूंच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. परंतु, २४ चेंडूंत २४ धावा करून त्याने तंबूचा रस्ता धरला. यानंतर जेम्स व्हिन्स (२५) याने ऍलिस्टर कूकसह (३९) दुसर्या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी रचली. परंतु, सात धावांच्या अंतराने ही दुकली परतल्याने इंग्लंडचा संघ ३ बाद ९५ असा संकटात सापडला. रुटने यानंतर कप्तानी खेळी करताना मलानच्या साथीने किल्ला लढविला. इंग्लंडचा संघ वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या वाटेवर असताना स्टार्कने ज्यो रुट व यानंतर हेझलवूडने जॉनी बेअरस्टोव (५) यांना माघारी धाडले.