इंग्लंडसमोर ३९८ धावांचे आव्हान

0
131

येथे सुरू असलेली पहिली ऍशेस कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ३९८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथ व मॅथ्यू वेडच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ७ बाद ४८७ धावांवर घोषित केला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ३, तर मोईन अलिने २ आणि ब्रॉड व वोक्सने प्रत्येकी १ बळी घेतला. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने ७ षटके सावधरित्या खेळून काढत एकही गडी न गमावता १३ धावा जमवल्या आहेत.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने तिसर्‍या दिवसाच्या ३ बाद १२४ धावांवरून काल चौथ्या दिवशी पुढे खेळण्यास सुरुवात केली. हेड आणि स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाला अधिक धोके न पत्करता मोजून मापून फटके खेळले. हेड अर्धशतकानंतर ५१ धावांवर बाद झाला. यानंतर स्मिथ आणि वेडमध्ये शतकी भागीदारी झाली. या दरम्यान स्मिथने आपले २५ वे कसोटी शतक साजरे केले. दीडशतकाकडे वाटचाल सुरू असताना स्मिथ १४२ धावांवर बाद झाला. यानंतर वेडने टीम पेन (३४) आणि पॅटिन्सन (नाबाद ४७) यांना सोबत घेऊन ऑस्ट्रेलियाला ४०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

वेडने आपले तिसरे कसोटी शतक झळकावले. यानंतर कमिन्स आणि पेटिन्सन यांनी आक्रमक खेळ करत ऑस्ट्रेलियाला वेगाने धावा जमवून दिल्या. कमिन्स २२ आणि पॅटिन्सन ४७ धावांवर नाबाद राहिला. कसोटीचा अद्याप एक दिवस बाकी असून ऑस्ट्रेलियाचा विजय किंवा अनिर्णीत हे दोन निकाल संभव आहेत.

धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः सर्वबाद २८४
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद ३७४
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव (३ बाद १२४ वरून) ः स्टीव स्मिथ झे. बॅअरस्टोव गो. वोक्स १४२, ट्रेव्हिस हेड झे. बॅअरस्टोव गो. स्टोक्स ५१, मॅथ्यू वेड झे. डेन्ली गो. स्टोक्स ११०, टिम पेन त्रि. गो. अली ३४, जेम्स पॅटिन्सन नाबाद ४७, पॅट कमिन्स नाबाद २६, अवांतर २२, एकूण ११२ षटकांत ७ बाद ४८७ घोषित
गोलंदाजी ः स्टुअर्ट ब्रॉड २२-२-९१-१, ख्रिस वोक्स १३-१-४६-१, मोईन अली २९-१-१३०-२, ज्यो रुट १२-१-५०-०, बेन स्टोक्स २२-५-८५-३, ज्यो डेन्ली १४-१-७२-०
इंग्लंड दुसरा डाव ः रॉरी बर्न्स नाबाद ७, जेसन रॉय नाबाद ६, अवांतर ०, एकूण ७ षटकांत बिनबाद १३
गोलंदाजी ः पीटर सिडल २-०-४-०, नॅथन लायन ३-०-७-०, जेम्स पॅटिन्सन २-१-२-०.

स्टीव स्मिथने मिळविले अनोख्या पंक्तीत स्थान
एका कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत १४० किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील केवळ चौथा फलंदाज ठरला. पहिल्या डावात १४४ धावांची खेळी केलेला स्मिथ दुसर्‍या डावात १४२ धावा करून बाद झाला. असा पराक्रमक करणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍलन बॉर्डर पहिला खेळाडू ठरला होता. त्याने लाहोर येथे पाकिस्तानविरुद्ध १९८० साली नाबाद १५० व १५३ धावांची खेळी केली होती. यानंतर झिंबाब्वेचा अँडी फ्लॉवर (१४२ व नाबाद १९९, वि. द. आफ्रिका, हरारे, २००१), श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान (१६२ व १४३, वि. बांगलादेश, चट्टोग्राम, २००९) यांचा क्रम लागतो. याव्यतिरिक्त ऍशेस कसोटीच्या दोन्ही डावात शतके ठोकणारा स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा केवळ पाचवा खेळाडू बनला. मॅथ्यू हेडन, स्टीव वॉ, आर्थर मॉरिस व वॉरेन बार्डसले यांनी अशी कामगिरी केली आहे