स्टीव स्मिथ (८०) व मार्नस लाबुशेन (४८) यांच्या उपयुक्त योगदानानंतरही इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ २२५ धावांत आटोपला. त्यामुळे पहिल्या डावात २९४ धावांपर्यंत मजल मारलेल्या यजमान इंग्लंडला ६९ धावांची मौल्यवान आघाडी मिळाली. दुसर्या दिवसअखेर इंग्लंडने आपल्या दुसर्या डावात बिनबाद ९ धावा करत एकूण आघाडी ७८ धावांची केली आहे. पहिल्या दिवसाच्या ८ बाद २७१ धावांवरून पुढे खेळताना जोस बटलर व जॅक लिच यांनी सावध खेळ करत संघाची धावसंख्या २९४ पर्यंत नेली.
याच धावसंख्येवर दोघे बाद झाल्याने यजमानांना तीनशे धावांची वेस ओलांडता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श याने ४६ धावांत सर्वाधिक ५ गडी बाद केले. कमिन्सने ३ व हेझलवूडने २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. जोफ्रा आर्चर याने यानंतर अचूक टप्पा व दिशा राखत कांगारूंच्या फलंदाजांना जखडून ठेवतानाच त्यांचे बळीदेखील घेतले.
डेव्हिड वॉर्नर (५) याच्या अपयशाची मालिका कायम राहिली. स्मिथ व लाबुशेन यांचा अपवाद वगळता तळाला केवळ नॅथन लायन (२५) याने प्रतिकार केला. इंग्लंडकडून आर्चरने ६२ धावांत ६ गडी बाद केले.