
>> विश्वविजेतेपदासाठी रविवारी फ्रान्सशी लढत
स्ट्रायकर मारियो मँजुकिच याने ज्यादा वेळेत हेडरद्वारे नोंदविलेल्या अप्रतिम गोलाच्या जोरावर क्रोएशियाने बलाढ्य इंग्लंडला जोरदार हादरा देत २-१ अशा विजयासह विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. क्रोएशियाने प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. आता १५ जुलै रोजी होणार्या अंतिम फेरीत क्रोएशियाची गाठ बलाढ्य फ्रान्स संघाशी पडणार आहे. पराभवामुळे इंग्लंडने १९६६नंतर पुन्हा एकदा विश्वचषक उंचावण्याची संधी गमावली.
काल झालेल्या दुसर्या उपांत्य लढतीत दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ पहायला मिळाला. सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला इंग्लंडने आपले खाते खोलले. २० यार्डावर मिळालेल्या फ्री-किकचे सोने करताना मध्यपटू कायरन ट्रिपियरने क्रोएशियन गोलरक्षकाला कोणतीही संधी न देता इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात त्यांनी ही आघाडीराखली.
दुसर्या सत्रात क्रोएशियाने जोरदार मुसंडी मारताना ६८व्या मिनिटाला बरोबरी साधण्यात यश मिळविले. व्रसाल्जकोकडून मिळालेल्या पासवर इवान पेरिसिचने गोल नोंदवित क्रोएशियाला ही बरोबरी साधून दिली. पूर्ण वेळेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत राहिले होते. त्यामुळे रेफ्रीने निकालासाठी जादा वेळेचा अवलंब केला. त्यात १०९व्या मिनिटाला इवान पेरिसिचने घेतलेल्या कॉर्नरकिकवर ज्युवंेंटसचा स्ट्रायकर मारियो मँजुकिचने हेडरद्वारे अप्रितिमरित्या चेंडूला जाळीची दिशा दाखवित क्रोएशियाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हाच या सामन्यातील विजयी गोल ठरला. या विजायामुळे क्रोएशियाने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पाचव्या प्रयत्नात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. तर इंग्लंडला १९६०नंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देण्याची संधी मिळाली होती. परंतु पराभवामुळे त्यांच्या जेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या. आता शनिवार १४ जुलै रोजी होणार्या तृतीय स्थानासाठीच्या लढत इंग्लंडला बेल्जियमशी लढावे लागणार आहे.