
>> तिसरा सामना ८ गडी व ३३ चेंडू राखून जिंकला
यजमान इंग्लंडने तिसर्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा ८ गडी व ३३ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह त्यांनी तीन सामन्यांची मालिका २-१ अशी खिशात घातली.
भारताचा डाव ८ बाद २५६ धावांत रोखल्यानंतर इंग्लंडने विजयी लक्ष्य ४४.३ षटकांत २ गडी गमावून काढले. ज्यो रुटने आपले तेरावे वनडे शतक ठोकताना १२० चेंडूंत नाबाद १०० व ऑईन मॉर्गन १०८ चेंडूंत नाबाद ८८ धावा केल्या. भारतातर्फे शार्दुलने एक गडी बाद केला. व्हिन्स धावबाद झाला.
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चाचपडल्यानंतर रोहित शर्मा १८ चेंडूंत दोन धावा करून माघारी परतला. शिखर धवन (४४) व विराट कोहली (७१) यांनी दुसर्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी करत भारतीय संघाचा डाव काही प्रमाणात सावरला. इंग्लंडसाठी ही जोडी धोकादायक ठरत असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात स्टोक्सच्या थेट फेकीवर धवन धावबाद झाला. या विकेटच्या पतनानंतर अधोगतीला खर्या अर्थाने सुरुवात झाली.
लोकेश राहुलच्या जागी संधी मिळालेल्या कार्तिकने स्थिरावल्यानंतर आपली विकेट फेकली. तर वेगाने धावा जमविण्यासाठी संघात घेतलेलेल्या रैनाने चार चंेंडूत एक धाव करून परतीचा रस्ता धरला. धोनीने कुर्मगती फलंदाजी करताना ६६ चेंडूंत ४२ धावा केल्या. हार्दिक पंड्या (२१), भुवनेश्वर कुमार (२१) व शार्दुल ठाकूर (नाबाद २२) यांच्यामुळे भारताला निर्धारित ५० षटके खेळता आली. इंग्लंडकडून डेव्हिड विली व आदिल रशीदने प्रत्येकी ३ गडी बाद केले. वूडने एक बळी घेतला.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला १ ऑगस्ट रोजी सुरुवात होणार असून तत्पूर्वी, भारतीय संघ इसेक्सविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे.