आयसीसी अंडर १९ क्रिकेट स्पर्धेतील नवव्या व दिवसातील दुसर्या सामन्यात बलाढ्य इंग्लंडने नामिबियाचा ८ गडी व १५५ चेंडू राखून फडशा पाडला. नामिबियाने विजयासाठी ठेवलेले १९७ धावांचे माफक आव्हान इंग्लंडने २४.१ षटकांत २ गडी गमावून गाठले.
प्रथम फलंदाजी करताना नामिबियाला इंग्लंडच्या नियंत्रित मार्यासमोर ५० षटकांत ९ बाद १९६ धावा करता आल्या. शॉन फॉशे (४४), निकोल लॉफ्टी इटन (३६), लोहान लॉरेन्स (२४) व पीट्रस बर्गर (२२) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा नेटाने सामना केला. परंतु, चांंगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळी रुपांतर करण्यात त्यांना यश आले नाही. इंग्लंडकडून लेगस्पिनर ल्युक हॉलमन याने ३, हॅरी ब्रूक व टॉम स्क्रीवन यांनी प्रत्येकी २ तर इथन बाम्बर व विल जॅक्स यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. पाठलाग करताना दहाव्या षटकांत इंग्लंडची २ बाद ६८ अशी स्थिती होती. यानंतर हॅरी ब्रूक (४८ चेंडूंत नाबाद ५९) व विल जॅक्स (४४ चेंडूंत नाबाद ७३) यांनी नामिबियाच्या गोलंदाजांची कत्तल करताना वेगाने धावा जमवल्या. नामिबियाकडून दोन्ही गडी लॉटिरंग याने बाद केले.