इंग्लंडची प्रथमच पेनल्टी शूटआऊटवर बाजी

0
107
England's players celebrate their victory at the end of the Russia 2018 World Cup round of 16 football match between Colombia and England at the Spartak Stadium in Moscow on July 3, 2018. / AFP PHOTO / Mladen ANTONOV / RESTRICTED TO EDITORIAL USE - NO MOBILE PUSH ALERTS/DOWNLOADS

>> कोलंबियाचा पराभव; उपांत्यपूर्व फेरीत स्वीडनशी लढत

इंग्लंडने विश्वचषक स्पर्धेत प्रथमच पेनल्टी शूटआऊटचा अडथळा दूर करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. यापूर्वी त्यांना १९९०, १९९८ आणि २००६मध्ये पेनल्टी शूटआऊटवर बाहेरचा रस्ता धरावा लागला होता. काल झालेल्या रोमहर्षक लढतीत त्यांनी कोलंबियाचे आव्हान पेनल्टी शूटआऊटवर ४-३ (१-१) असे मोडीत काढले.

यापूर्वी झालेल्या विश्वचकांतील सामन्यांत इंग्लंडला तीन वेळा पेनल्टी शूटआऊटवर पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु काल त्यांनी कोलंबियाविरुद्ध त्या अडथळ्यावर मात करीत नवा इतिहास रचला. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील हा शेवटचा उपउपांत्यपूर्व सामना अत्यंत्य रोमहर्षक ठरला. सामन्याचे पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत संपले होते. परंतु दुसर्‍या सत्राच्या ५७व्या मिनिटाला कर्णधार हेरी केनने पेनल्टीवर गोल नोंदवित इंग्लंडचे खाते खोलले. केनचा या विश्वचषकातील हा ६वा गोल ठरला. तो ‘गोल्डन बूट’चा प्रमुख दावेदार बनला आहे.

इंग्लंड हा सामना १-० असा जिंकणार असे वाटत असताना इंज्युरी वेळेत ९०+३ मिनिटाला येरी मिनाने हेडरद्वारे गोल नोंदवित कोलंबियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर ज्यादा वेळेतही दोन्ही संघांना गोल नोंदविण्यात अपयश आल्याने पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला आणि त्यात इंग्लंडने बाजी मारली.
इंग्लंडतर्फे हेरी केन, मार्कुस रॅशफोर्ड, कायरन ट्रायपियर आणि एरिक डायर यांनी गोल नोंदविले. तर जॉर्डन हेंडरसनने आपली पेनल्टी किक वाया घालविली. तर कोलंबियाच्या रॅडामेल फाल्काव, जुआन क्वाड्राडो, लुईस म्युरियल यांनाच इंग्लंडच्या गोलरक्षकाला चकविता आले. तर मातुएस इरिबे व कार्लोस बाक्का यांचे फटके इंग्लंडच्या गोलरक्षकाने अडकवित संघाला उपांत्यपूर्व फेरीचे दरवाजे उघडून दिले. या विजयाबरोबरच इंग्लंडने आपल्या दुसर्‍या जगज्जेतेपदाकडे वाटचाल केली आहे. यापूर्वी १९६६मध्ये इंग्लंडने विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर अजूनपर्यंत त्यांना अंतिम फेरीत धडक मारता आलेली नाही.